प्रकरण ८ वे पेशव्यांचा शब्द मोडला. अनुचित कत्तल.

                            प्रजातंत्राचा प्रणेता         प्रकरण ८ वे           पेशव्यांचा शब्द मोडला. अनुचित कत्तल.

तात्यांनी पेशव्यांकडे दूत पाठवून निरोप दिला, ‘स्वामी, जनरल व्हीलरनं तटावर शांततेचं निशाण  उभारलं असून युध्द थांबवलं आहे. ’’

    पेशव्यांनी मान डोलावली आणि हुकूम दिला. ‘ ठीक आहे. आता युध्द तहकूब. अझिमुल्लाखान जनरल व्हीलरना चिठ्ठी लिहा. ज्या लोकांचा डलहौसीच्या राजकारणाशी संबंध नसेल त्यांना अलाहाबादला पाठवण्यात येईल.’’ नानासाहेबांच्या मनात त्यांच्या बद्दल कणव असली तरी शिपायांच्या आणि लोकांच्या मनात क्रोध धुमसत होता. इंग्रजांनी केलेले अत्याचार ते विसरू शकत नव्हते.

      २१ दिवसांच्या वेढ्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी कानपूर शहरावर विजय मिळवला. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या नावाची दवंडी पिटण्यात आली. तबला वादकानं डग्ग्यावर थाप वाजवत दवंडी दिली.

   ‘ ऐका हो, ऐका श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी कानपूर नगरावर विजय मिळवला आहे हो ऽ ऽ ऽ ’’

       श्रोते आनंदित झाले. एक तरुण श्रोता अति उत्साहित होऊन उठला आणि त्या दवंडीचा पुनरूच्चार करीत देवळाच्या भोवती फिरू लागला. आणखीन काहींनी त्याला साथ देत फेर्‍या मारायला सुरूवात केली.  तबलजी तबल्यावर थाप देतच होते. हार्मोनियमवर मंगल सूर वाजू लागले. त्याक्षणी त्या देवळातील वातावरण एकदम उत्साहित झालं. तात्या टोपेंच्या पुतळ्याजवळ येताच  तरुणानं घोषणा दिली.

   तात्या टोपे की जय/ तात्या टोपे की जय / तात्या टोपे की जय/

    येवले गाव झिंदाबाद/ येवले गाव झिंदाबाद/येवले गाव झिंदाबाद/

       बाहेर गेलेले श्रोते घोषणा देत देत देवळाच्या गाभार्‍यात परत आल.

    बुवास्वत:शीच स्मित करीत उभे होते. बुवांनी पुढे सांगायला सुरूवात केली, ‘श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी टोलेजंग दरबार भरवला. लष्कराचे शिपाई, घोडदळ, तसंच गावोगावाहून युध्दासाठी आलेल्या स्वयंसेवी संघटनांच्या टोळ्या आपल्या आपल्या निशाणांसह शिस्तीत उभ्या झाल्या. प्रथमत: दिल्लीच्या बादशहाच्या नावानं एकशे एक तोफांची सलामी देण्यात आली. श्रीमंत नानासाहेब पेशवे मैदानावर येताच सर्वांनी उस्फूर्तपणे त्यांचा जयजयकार केला. एकवीस दिवसांच्या वेढ्याबद्दल एकवीस तोफांची सलामी पेशव्यांना देण्यात आली. श्रीमंत रावसाहेब आणि बाळासाहेब यांना सतरा तोफांची, तर ब्रिगेडियर ज्वालाप्रसाद यांना आणि सेनापती तात्या टोपे यांना अकरा तोफांची सलामी देऊन त्या सर्वांप्रती आदर व्यक्त करून सन्मान करण्यात आला. त्यानंतर ते सर्व ब्रह्मवर्ताकडे जायला निघाले. तिथल्या जनतेचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी गुढ्या उभारून, तोरणं लावून आपल्या राजाचं आनंदानं स्वागत केलं.

     मुहूर्त पाहून पेशव्यांच्या राज्यारोहणाचा समारंभ झाला. श्रीमंत नानासाहेब पेशवे एका स्वतंत्र, स्वकष्टार्जित, स्वधर्मप्रतिपालक सिंहासनावर आरोहित झाले.

     बुवांचं हे वर्णन सुरू होतं तेव्हाच देवळातील श्रोत्यांमधील काहीजण उभे झाले आणि घोषणा देऊ लागले,

श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा जयजयकार असो/ श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा जयजयकार असो/

   श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा जयजयकार असो/

  देवळाचा गाभारा आनंदमय वातावरणानी भरून गेला. आजूबाजूच्या पंचक्रोषित तोच आवाज दुमदुमत होता.  

+ + + +
‘ हे गणराया आम्हाला मार्ग दाखवा. ’’ नानासाहेब कळवळून देवाला विनवत होते. रावसाहेब अधिकच बुचकळ्यात पडले. मनातला प्रश्‍नांची गर्दी अधिकच वाढली. शेवटी न राहवून त्यांनी हळूच विचारलं,

  ‘ काकासाहेब काही अडचण?’’ नानासाहेबांनी त्यांना झालेला प्रकार सांगितला.

रावसाहेब म्हणाले,  ‘ काळजी का करता? तात्या सगळं नीट हाताळतील.

नानासाहेबांनी विचारलं, ‘ तात्या आहेत कुठे ? ’’  त्यांच्या मनातली अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत होती. रावसाहेब दालनाबाहेर गेले. तिकडे काय झालं असेल या काळजीनं नानासाहेबांची अस्वस्थता  वाढत होती. ’ कानपूरमध्ये अझिजान आणि अझिमुल्लाखान यांचा बराच दरारा आहे. सैन्यातले शिपाई त्यांनाच मानतात. शत्रूविषयीचा त्यांच्या मनात असलेला रागही रास्तच आहे. या आमच्या देशातला एक एक भूभाग इंग्रज गिळंकृत करत निघाले आहेत. पण तरीही इस्पितळत असणार्‍या नि:शस्त्र, निरपराध, इंग्रजांवर हल्ला करणं हे आपल्या संस्कृ तीत बसत नाही.शिवाय त्यांनी आमच्यावरच्या  विश्‍वासाने त्या आजार्‍यांना कानपूर मध्ये इस्पितळात ठेवलं आहे. त्या ठिकाणी जर त्यांची कत्तल केली तर आम्ही त्यांचाफार मोठा विश्‍वासघात केला असंच होईल.- - आणि तात्या म्हणतात त्याप्रमाणे इंग्रज चिडले आणि  इंग्रजांनी चहूबाजूनी आमच्यावर हल्ला केला तर आम्ही आपल्याला वाचवायला समर्थ आहोत का? - आज तरी नाही असंच म्हणावं लागेल. बोलता बोलता नानासाहेब अस्वस्थपणे दालनाच्या या कोपर्‍या पासून त्या कोपर्‍यापर्यंत फेर्‍या मारू लागले. पण  तात्यांकडून अजून काहीच का निरोप नाही? ’

     अशी वाट पाहणं  जीव टांगणीला लावतं. नानासाहेबांनी डोळे मिटले आणि उघडले. तर समोर रावसाहेब दिसल नानासाहेबांनी विचारलं,. ‘ रावसाहेब काय झालं? तात्या कुठे आहेत?  ’’

रावसाहेब स्मित करत उत्तरले, ‘  येताहेत. टॉडला बरोबर घेऊन येत आहेत. ’’

नानासाहेबांनी  उत्सुकतेनं विचारलं, ‘ इंग्रजांना पटलं? आम्ही त्यांना मदत करत आहोत ते? बोला. लवकर बोला. आमचा जीव टांगणीला लागला आहे. ’’

रावसाहेब सांगू लागले. ‘ काकासाहेब तात्या महान आहेत. तात्यांनी एका  महिलेच्या हातात चिठ्ठी देऊन तिला इस्पितळाच्या आत सोडलं. तात्या तिथेच उभे होते. एक तासानंतर मागच्या भिंतीवरून उडी मारून तो तात्यांसमोर उभा झाला. टॉड, टॉड होता तो. तात्यांना म्हणाला, जेननी तुमचं हँडरायटिंग ओळखलं. आम्हाला खूप धीर आला, काकासाहेब, टॉड खूप भयानक दिसत होता. मळकट, चुरगळलेले कपडे त्यावर रक्ताचे डाग होते. त्याचे डोळे लाल दिसत होते.आम्हाला वाटतं भीतिमुळे ते लोक झोपलेही नसावेत. ’’

   ‘ घाबरले असतील हो, निरपराध, नि:शस्त्र बिचारे- - ’’  इतक्यात तात्या  आणि मळलेल्या कपड्यात टॉड प्रवेशले. ‘ टॉड, ही काय हालत करून घेतलीत? ’’ नानासाहेबांनी विचारलं.

टॉड काहीही न बोलता खाली बसला. त्याचे डोळे वाहत होते. ‘ नानासाब- -’’

नानासाहेबांना त्याची कीव आली. समजुतीच्या स्वरात ते म्हणाले,‘ टॉड, उठा. रावसाहेब टॉडना आत न्या. सेवकांना सांगून त्यांच्या स्नानाची आणि जेवण्याची व्यवस्था करायला सांगा.                                                                                                                                                                              

रावसाहेब म्हणाले, ‘ ठीक आहे. टॉड चला.’’ त्यांनी टॉडला हात देऊन उठवलं. पण त्याच्या शरीराला येणारी दुर्गंधी सहन होत नव्हती.  ते  आत गेले. पाठोपाठ टॉड गेला.

नानासाहेबांनी तात्यांना विचारलं, ‘ तात्या!  इंग्रजांच्या सोडवणुकीबाबत काय विचार केला? ’’

तात्या उत्तरले,‘ स्वामी, सर्वप्रथम त्या लोकांसाठी खायला अन्न आणि प्यायला पाणी याची व्यवस्था करायला हवी, असं वाटतं. ते उपाशी आहेत. तहानेने व्याकुळ झाले आहेत. ’’

‘ठीक आहे.’’ नानासाहेबांनी टाळी वाजवली.सेवक आला आणि मुजरा क.रून उभा राहिला. नानासाहेबांनी फर्मावलं, ‘हे पहा लालपुरीबाबाला म्हणावं खानसम्याला सांगा, पंचवीस तीस जणांचं जेवण तयार करा आणि ते जेवण आणि प्यायचं पाणी घेऊन लवकरात लवकर इस्पितळात पोचवा. ’’

‘ जी. ’’  सेवक मुजरा करून गेला.

        काही क्षणांनंतर रावसाहेब आले, नानासाहेबांच्या जवळ जाऊन त्यांनी काहीतरी सांगितलं. नानासाहेबांनी मान हलवून सम्मती दर्शवली. रावसाहेब आत  गेले आणि काही वेळात टॉडसह प्रवेशले. तात्या टॉडकडे पहातच राहिले. त्यानं स्वच्छ  धोतर आणि कुडता घातलेला होता. त्याचा मूळचा गोरा रंग अधिकच उजळला होता. नानांना मुजरा करून तो उभा राहीला.

नानासाहेब हसून म्हणाले,‘ टॉड, बरीच तरतरी आलेली दिसते आहे. हो ना? तुम्हाला काय वाटतं?  तात्या? ’’  तात्यांनी स्मित केलं.

नानासाहेब पुढे  बोलू लागले, ‘टॉड, आज रात्रीला तुम्ही सर्व नदी किनारी पोचा.’’ नकारार्थी मान हलवत टॉड म्हणाला,  ‘ ओह नो. कॅन दे वॉक? ’’  

तात्यांनी सांगितलं, ‘ खरं आहे. सगळे पार गलितगात्र झाले आहेत. पण टॉड घाबरू नका त्यांच्या पोटापाण्याची सोय स्वामींनी केली आहे. तेव्हा रात्रीला तुम्ही सर्व नदीच्या काठावर पोचा. ’’

टॉड घाबरला  ‘  इन नाईट? ते आमाला किल तर करणार नाही ? नाईटला - -

    ‘ ठीक आहे. रात्री नाही तर अगदी पहाटे उजाडताच नदीच्या किनारी पोचा. तिथे तुमच्यासाठी नावा तयार असतील. ’’  नानासाहेब उत्तरले.

टॉड ठामपणे म्हणाला, ‘  नानासाहाब, हम नाव एक्झामिन करेंगे. ’’

नानासाहेबांनी कबूल केलं. ‘  ठीक आहे. तात्या यांना नावांमधून  पाठवण्याची जबाबदारी तुमची. ’’

तात्या उत्तरले, ‘ जशी आज्ञा. आज संध्याकाळीच सतीचौडा घाटावर जवळजवळ चाळीस नावा तयार राहतील. एका नावेत खाण्यापिण्याचे पदार्थ राहतील. हां, टॉड, पण नावांची चाचणी करण्याची व्यवस्था आजच करा. ती जबाबदारी तुमची. ’’

टॉड हसला, ‘  थँक्यू नानासाब. थँक्यू तात्या. हर एक इंग‘ज तुम्हाला ब्लेसींगज् देईल. ’’

    ‘ बस, बस. हरभर्‍याच्या झाडावर नका चढवू. आम्ही तुमच्याशी चांगले वागलो, हे पुढे  कोणाच्या लक्षात राहतं का ते काळच ठरवेल. ’’ तात्या गालातल्या गालात हसत म्हणाले.

 टॉडला काहीच कळलं नाही. ‘ व्हॉट? ’’

 ‘  स्वामी, मला आज्ञा द्यावी,’’ तात्यांनी अनुज्ञा घेतली आणि ते पुढच्या तयारीसाठी गेले.

  ‘ येस. लेट मी गो. सगळे वेट करत असतील. ’’ नानासाहेबांनी मानेनेच होकार दिला. त्यांची अस्वस्थता बरीच कमी झाली होती.

+++++

-कीर्तनकार आळेकरबुवा सांगत होते, तर महाराजा, इंग्रजांच्या पोटापाण्याची सोय झाली. नदीकिनारी नावा उभ्या झाल्या इस्पितळातल्या इंग्रजांनी त्या तपासल्या. तसच ते नावामध्ये बसले आणि गेले,- - गेले? नाही. अहो, काय सांगावं, थोडे दूर गेले आणि त्यांच्यावर हल्ला झाला. जवळपास सगळेच मारले गेले.

            बुवा गात सांगू लागले.- ऐसे  कैसे झाले  ?/ कोणी केले ऐसे/

                                                    काही कळेना,काही कळेना /

 अहो!  नानासाहेब पेशव्यांचा शब्द मोडला गेला.पेशव्यांचा शब्द मोडला, पण कोणी? आणि का? काहीच कळेना. मग हे झालं कसं?

बुवांनी हातातली झांज जोरात वाजवली आणि म्हणाले, काय सांवं? अझिमुल्ला खाननं आपल्या सोबत्यांना भरभरून बक्षिशी दिली. अझिजानची भेट घेऊन त्यानं तिला सांगितलं, चला आपणही - जरा ऐकू या- -

     ’ तात्या सोचता है  की वह हमारे हाथों से अंग्रेजोको  छुडाकर नौकाओ से भेज देगा. (हसून) लेकिन हम भी कुछ कम नही है बच्चू !- - वाह ! अझिजान तुम्हारी भी कमाल है. क्या दिमाग चलाया तुमने. अंग्रेजों से भरी नौकाएं दूर जाते ही हमारे सिपाहियों ने हमला किया . वाह! वाह !! वाह!!  ’ तो जोरजोरात  हसला.

    अझिजानही गालातल्या गालात हसली आणि त्याला निरोप दिला.

कुठे गेला तो? काय होतं त्याच्या मनात? काय बेत आखला होता त्यानं? त्याला जाऊ द्या. सती चौडा हून  चाळीस नावांमध्ये इंग्रज निघाले परंतु त्या पैकी एकच नाव  हल्यातून निसटली. जाताना लागणार्‍या खेडेगावच्या हल्यातून फक्त चारपाच इंग्रज वाचले. दुर्जनसिंग नावाच्या जमीनदाराला त्यांची कींव आली.  त्यानं त्यांना कपडालत्ता आणि तूपरोटी दिली. महिनाभर त्यांचा पाहुणचार करून त्यांना अलाहाबादला रवाना केलं.

    ‘ अरे वारे वा, दुर्जनसिंग.’’  देवळातला एक श्रोता संतापानं उद्गारला. त्याबरोबर मघाच्या तरुणांनं नारा दिला. दुर्जनसिंग मुरदाबाद
  बाकीच्यांनीही उच्चस्वरात साथ दिली. दुर्जनसिंग मुर्दाबाद/ मुर्दाबाद/

  बुवा गोंधळले. क्षणभर त्यांना काहीच सुचेना. तिन्हीसांजा झाल्या तेव्हा, कीर्तन थांवण्याच्या उद्देशानं त्यांनी नामस्मरणाला सुरूवात केली. म्हणा -विठ्ठल/ विठ्ठल / विठ्ठल/ पुंडरिक वरदा हरी विठ्ठल / श्रीज्ञानदेव तुकाराम/पंढरीनाथ महाराज की जय/श्रोते नाराजीनंच उठले.

+++++


Comments

Popular posts from this blog

प्रकरण १ ले येवले मुक्कामी तात्या टोपे यांच्या जीवनकार्यावर आख्यान

प्रकरण ७ वे इस्पितळातील इंग्रजांना मारू नका’, नानासाहेबांचा हुकुम; उठावाला जोर.

प्रकरण ५ वे पेशव्यांची जनजागृती मोहीम; ३१ मे अगोदरच भडका