प्रकरण ११ वे तात्यांचं युद्धनैपुण्य

                                        प्रजातंत्राचा  प्रणेता      प्रकरण ११ वे          तात्यांचं युद्धनैपुण्य

   बुवा सांगत होते, तात्यांच्या कर्तृत्वाच्या बातम्या येत होत्या. तात्या पुढे पुढे जात होते. त्यांनी विजेता हॅवलॉकवर आक्रमण केलं. त्यांनी काल्पीचा किल्ला हस्तगत करून तिथे छावणी केली आहे. शिपायांच्याकडून कवायती करवून घेणं, शस्त्र तयार करणासाठी कारखाने उभे करणं, शस्त्रागार सुसज्ज ठेवणं अशी सर्व कामं सुरू केली आहेत.

   एक दिवस रावसाहेब हसत हसत आले, म्हणाले, ‘ काकासाहेब, काय सांगू, आपले सैनिक इतके चपळ आहेत, वेगानं जातात आणि हमला करून परत येतात. काकासाहेब असं सांगतात की, काल्पीला सर्वत्र भगवे झेंडे फडकत आहेत. ’’

नानासाहेबांना आनंद झाला परंतु मनातल्या मनात खंत वाटली ते म्हणाले, ‘ रावसाहेब, तात्यांना ओळखायला आम्ही फारच उशीर केला. फार चतुर सेनानी आमच्या जवळ होता पण आम्ही त्याला ओळखलंच नाही. तात्यांनी काल्पीच्या किल्ल्यामुळे झाशी जवळ आणली. रावसाहेब आम्हाला वाटतं की, आता ग्वालेरच्या सैन्याचं मन वळवून ते आपल्याकडे यावं अशी व्यवस्था करावी आणि हे काम तात्याच योग्यप्रकारे करतील.’’

रावसाहेबांनी होकारार्थी मान हलवित म्हणाले, ‘ खरं आहे.’’ नानासाहेबांचा निरोप घेऊन रावसाहेब निघाले.      

  तिकडे तात्यांना ग्वालेरी जाण्याचा निरोप पोचताच तात्या वेश बदलून ग्वालेरला गेले. तिथली सेना निष्क्रिय झाली होती. तात्यांच्या आवेशपूर्ण  भाषणानं त्यांनी त्या सैन्याला जिंकून घेतलं. त्यांच्यात चैतन्य आलं. शिपायांच्या मनात स्वातंत्र्य प्रेमाची भावना जागृत झाली. पण शिंदे सरकारांचे दिवाण दिनकरराव राजवाडे यांच्या कानावर ही बातमी गेली. ते खूप चिडले. त्यांच्या सैन्यासमोर उभं राहून ते म्हणाले, लक्षात ठेवा, त्या विद्रोही तात्याला तुम्ही साथ देताहात. त्याला साथ देणार्‍यांना सैन्यातून बडतर्फ केलं जाईल. कोण कोण जाणार आहे तात्या टोपे याच्याबरोबर? त्यांच्या सैन्यातल्या सगळ्यांनीच हात वर केला. दिनकरराव तर पहातच राहिले. ग्वालेरहून परत फिरताना तात्यांनी ग्वालेरच्या सैन्यापैकी मोरारच्या छावणीतील पायदळ, घोडदळ, शिवाय तोफखान्यासह फौज काल्पीला आणली. या सैन्याची व्यवस्था पाहण्याचा अधिकार पेशव्यांनी बाळासाहेबांकडे देण्याचं ठरवून त्यांना तात्यांच्या मदतीसाठी काल्पीला पाठवलं. पेशव्यांसाठी काल्पी शहर हे लष्करी ठिकाण म्हणून अत्यंत महत्त्वाचं होतं. काल्पी शहर शिवराजपुरीपासून जवळच. काल्पी आणि कानपूर यांच्यामधून यमुना नदीचा प्रचंड प्रवाह वहात होता.

   रावसाहेबांना ही बातमी कळली तेव्हा ते तडक पेशव्यांच्या महालात आले. ते खूपच खूश होत, म्हणाले,

‘ काकासाहेब!अहो! काय सांगावे, कानपूर मध्ये विडहॅमला  हे कळलं तेव्हा तर तो इतका चिडला म्हणे ! काकासाहेब, तात्या इतके चतुर असतील असं वाटलं नव्हतं. नाही का? ’’ रावसाहेबांचा आनंद गगनात मावत नव्हता.

नानासाहेब म्हणाले, ‘ रावसाहेब,आम्हाला तात्यांच्या चतुराईचं कौतुक तर वाटतंच. अभिमानही वाटतो. पण, पण रावसाहेब, राहून राहून हेच वाटतं की, आम्हाला हे फार पूर्वी उमगायला हवं होतं हो. पिताश्रींनी तात्यांच्या हातात कलम दिली होती, ती काढून त्या ऐवजी आम्ही  तरवार द्यायला हवी होती. ’’

नानासाहेब आनंदाने उद्गारले, ‘ तात्या, तुमच्या पराक्रमाचा डंका चारही दिशांना वाजतो आहे.वाह ! वाह! वाह! ’’

      ++++
 कीर्तनकार आळेकरबुवासुध्दा तात्यांच्या पराक्रमाचं वर्णन करण्यात रंगले होते. ते सांगत होते, इकडे सर कोलिन लखनौच्या मुक्ततेकरता कानपूर सोडून निघाल्याचं तात्यांना कळलं. कानपूरच्या रक्षणाकरता  युरोपमध्ये झालेल्या लढायात  प्रसिध्द झालेला जनरल विडहॅम याला ठेवण्यात आलं होतं. सर कोलिन तिथून गेलेला आणि गोर्‍यांची नवीन कुमक यायची होती ह्या संधीचा फायदा आपण घ्यावा असा विचार करून तात्यांनी नानासाहेबांना आपल्या मनातील योजना कळवली. पेशव्यांनी त्या कामावर तात्यांचीच नेमणूक केली. त्यांना मुख्य सेनापती घोषित करून तात्यांनी ग्वालेरहून आणलेलं सैन्य घेऊन धाडण्यात आलं. कानपूरच्या  इंग्रजांच्या सैन्याची माहिती काढून तात्यांनी काल्पी सोडली, यमुना नदी उतरून जालन इथे ते पोचले. तिथे त्यांनी आपला खजिना वगैरे ठेवला. लखनौचे शिपाई काही दिवस तरी सर कोलिनला गुंतवून ठेवत आहेत असा रंग दिसताच तात्या शिवराजपूर पर्यंत आले. वाटेत लष्करी महत्त्वाच्या ठिकाणी सैन्याची ठाणी टाकली. फत्तेपूरला इंग्रजांची लष्करी छावणी होती. तात्यांनी कुंवरसिंग आणि दिनापूरच्या सैन्याच्या तीन तुकडयांनी इंग्रज सैन्याला थोपवून ठेवलं. अशाप्रकारे तात्यांनी इंग्रजांना मिळणार्‍या रसदीचा मुख्य मार्ग बंद केला.

      ‘ वा! तात्या वा! ’’  एक श्रोता न राहवून  उंच स्वरात म्हणाला.

    बुवा हसले. ते पुढे बोलू लागले, तात्यांचे डावपेच जनरल विडहॅमच्या लक्षात आले. त्याने कलकत्त्याहून जात असलेल्या गोर्‍या सैन्याला थांबवून घेतलं आणि तात्या सर कोलिनच्या पाठीवर जातो की, कानपूरवर चढाई करतो याची विडहॅम वाट पहात राहिला. पण अशी वाट पाहणं हा विडहॅमचा स्वभाव नव्हता. शिवाय ‘आशियातील लोकांचा पराभव करण्याची उत्तम युक्ती म्हणजे त्यांच्यावर सरळ आक्रमण करणं. यामुळे ते लोक घाबरून सैरावैरा पळत सुटतात. हा आंग्ल युध्दशास्त्रातला एक प्रयोगसिध्द नियम गोर्‍या शिपायाला सांगितला जात असे.’’ यानुसार विडहॅमच्या गोर्‍या सैन्याला काल्पीकडे वाटचाल करण्याचा हुकूम मिळाला. हे लक्षात येताच तात्यांनी सैन्याला अकबरपुराहून सुरवंडीला आणलं. नंतर सुरवंडीहून ते पांडुनदी काठी थांबलं. शत्रू नजीक आल्याची वर्दी मिळताच जनरल विडहॅमनं सैन्याला आक्रमणाचा हुकूम दिला. तात्यांचं सैन्य जंगलात लपलेलं होतं. त्यांनी गोर्‍या सैन्यावर तोफांचा मारा सुरू केला. दोन्हीकडून मारा सुरू होता. इंग्रजांना तीन तोफा मिळाल्या. इंग्रज सैन्य विजयाचा जयघोष करू लागलं. परंतु तात्यांचं घोडदळ पुढे सरसावलं. गोर्‍या फौजेला मागे रेटत रेटत थेट कानपूरपर्यंत आणलं. घोडेस्वार धड लढाई करीत नव्हते आणि पाठलाग सोडत नव्हते. फक्त शत्रूभोवती घिरट्या घालत होते. गोरे सैनिक अस्वस्थ झाले. दुसर्‍या दिवशी विडहॅमनं आपल्या सैनिकांना सकाळीच शस्त्रसज्ज होऊन रणांगणात उभं केलं. पण तात्यांच्या सेनेची काहीच हालचाल कळेना.

     ‘  मग? काय झालं?’’

    ‘युध्द थांबलं? ’’ श्रोत्यांमधून एका मागोमाग  प्रश्‍न आले. त्यांची उत्सुकता ताणली जात होती.

     बुवांनी हातातल्या झांजाचा झंकार केला आणि ते सांगू लागले. जनरल विडहॅमलाही असंच वाटलं असावं. त्याला सेनापती तात्या टोपेचा नक्की काय हेतू आहे तेच कळेना. शेवटी त्याचे सैनिक न्याहारीसाठी तंबूत गेले. त्यानं त्याच्या सहा तोफा ब्रह्मावर्ताच्या रोखाने पाठवल्या आणि दुपारी अचानक इंग्रज सैन्याच्या उजव्या बाजूकडे एक तोफेचा लालबूंद गोळा येऊन पडला. यातून गोरे सैनिक सावरतात न सावरतात तोच समोरूनही मारा सुरू झाला. जनरल विडहॅमला वाटलं आता ब्रह्मवर्ताकडूनही  हल्ला होईल की काय म्हणून त्यानं कार्थ्युला ब्रह्मवर्ताकडे आणखी सहा तोफा घेऊन पाठवलं. इकडे सेनापती तात्यांनी आपल्या सैन्याची अर्धवर्तुळाकार व्यूहरचना करून गोर्‍या सैन्याला समोरून आणि दोन्ही बाजूंनी कोंडीत  पकडलं. इंग्रजांच्या सैन्यातील डावी बाजू तोफा सोडून मागे फिरली. उजव्या बाजूकडील तोफा तग धरून होत्या, परंतु गोर्‍या सैनिकांच पायदळ मागे हटू लागलं. तात्यांच्या सैन्याला हे पाहून जोर चढला, त्यांचं अर्धवर्तुळ पुढे पुढे सरकू लागलं आणि त्या संध्याकाळी इंग्रजांचं सैन्य पूर्णपणे कोलमडून गेलं. त्यांचा सेनापती जनरल विडहॅम आणि सर्व सैन्य अस्ताव्यस्तपणे पळू लागलं. इंग्रजांचे हजारो तंबू, राहुट्या, बैल, दारूगोळा, रसद पोषाख तात्यांच्या सैनिकांच्या ताब्यात आलं. कानपूरचा अर्धा भाग पुन्हा सेनापती तात्यांच्या ताब्यात आला. बुवा अानंदानं उद्गारले, ‘‘अहाहा! धन्य त्या चतुर सेनानीची. तात्या ! तुमच्या चातुर्याचं वर्णन कोणत्या शब्दात करावं बरं?’’
 एवढ्यात श्रोत्यांमधून एक तरुण उभा झाला आणि घोषणा देऊ लागला, ‘ तात्या टोपे की जय/ तात्या टोपे की जय/ तात्या टोपे की जय/

 आणखी काही श्रोते उभे झाले आणि घोषणा देऊ लागले,‘ येवल्याच्या सेनानीचा विजय असो/ येवल्याच्या सेनानीचा विजय असो/येवल्याच्या  सेनानीचा विजय असो/ ’’

     देवळाच्या गाभार्‍यात आनंद मावत नव्हता. बुवांनीही आनंदाच्या भरात झांजांचा गजर सुरू केला, हार्मोनियमनं स्वरांची साथ दिली, तबल्यावर ठेका धरला गेला आणि डग्यावर थाप पडताच बुवांनी कीर्तनाच्या पुढच्या भागाला सुरूवात केली, श्रोतेहो, त्या रात्री विडहॅमनं ठरवलं की रात्रीच्या वेळी शत्रू बेसावध असेल तर त्याच्यावर अंधारात हल्ला करावा.

    ‘ अगबाई, मग?’’ एक बाई काळजीयुक्त स्वरात बोलल्या.

 बुवा हसले, म्हणाले, अहो! तो मराठा सेनानी निवडक शिपायांसह त्या रात्री रणांगणावर सावधगिरीनं उभा होता. ‘ वा रे पठ्ठे! ’’ एक श्रोता.

 ‘ याला म्हणतात, चातुर्य. तात्याचं किती कौतुक करावं? ’’आजीबाई म्हणाल्या.
  जनरल विडहॅमला हे कळलं तेव्हा दिवसाच लढण्याचं त्यानं ठरवलं मात्र काल झालेल्या चुका टाळण्याचं ठरवलं. दुसर्‍या दिवशी पुन्हा दोन्ही सैन्यं एकमेकांसमोर ठाकली. आज इंग्रज सैनिकांनी मागे न सरता आक्रमक वृत्तीनं  लढावं असा आदेश  विडहॅमनं दिला. गोर्‍या सैन्यानं सरळ धडक द्यायला सुरूवात केली, पण आज तात्यांचे सैनिकही आक्रमक झाले होते. ब्रिगेडियर विल्सन ठार, कॅप्टन मार्फी, मेजर स्टर्लिन, लेफ्टनंट केन, लेफ्टनंट गिबन सर्वांना तात्यांच्या सैनिकांनी चराचरा कापून यमसदनाला पाठवलं. त्या दिवशी इंग्रज सैन्याची खूपच दाणादाण उडाली. सेनापती तात्यांच्या सैन्यानं संपूर्ण कानपूर शहर काबीज केलं.

        सेनापती तात्या टोपे की जय/ श्रोत्यांमधला तोच मघाच तरुण उभा झाला आणि घोषणा दिली, त्याबरोबर  सर्वच श्रोते उच्च स्वरात घोषणा देऊ लागले. सेनापती तात्या टोपे की जय/ सेनापती तात्या टोपे की जय/ सेनापती तात्या टोपे की जय/

     श्रोत्यांचा आनंद पाहून बुवा स्वत:शीच हसले आणि सांगू लागले, तिकडे पेशव्यांच्या कानावर ही बातमी जाताच ते आनंदानं उद्गारले, ‘ वाह! तात्या वाह! सेनापती तात्यांच्या पराक्रमाचा डंका  या देशात सतत वाजत राहो. ’’

            बुवांनी नामस्मरणाला सुरूवात केली,विठ्ठल / विठ्ठल / विठ्ठल / पुंडलिक वरदा हरी विठ्ठल/ श्री  ज्ञानदेव तुकाराम/ पंढरीनाथ महाराज की जय /

  तिकडे लखनौमध्ये असलेल्या सर कोलिनच्या कानावर तात्यांच्या विजयाची बातमी गेली आणि तो अस्वस्थ झाला. तो आपल्या सैन्यासह अयोध्येकडून कानपूरकडे निघाला. तात्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी  अयोध्येकडील पुलावर तोफांचा मारा सुरू करायला सांगून तो पूल फोडण्याचे आदेश दिले. यामुळे गोर्‍या सैन्याला गंगा नदी उतरता येणं शक्य होऊ नये. पण तात्यांच्या तोफांचा रोख ओळखून सर कोलिननं तोफांचा उलट मारा सुरू केला. त्याचं सैन्य अयोध्येतून कानपूर शहरालगत येऊन पोचलं. पण तात्यांचे सैनिक कानपूर शहर सोडायला तयार  नव्हते. त्यांनी तिथेच कमांडर-इन-चीफ बरोबर दोन हात करण्याचा घाट घातला. सेनापती तात्यांनी आपल्या सैन्याची डावी फळी कानपूरच्या आणि गंगेच्या दरम्यान अडचणीच्या जागी ठेवली, सैन्याची मध्य फळी कानपूर शहरात आणि सैन्याची उजवी फळी गंगेच्या कालव्यावर पसरून ठेवली. तात्यांच्या सैन्यात लष्करी शिक्षण घेतलेले जवळ जवळ दहा हजार शिपाई होते. एक दिवस तसाच गेला. दुसर्‍या दिवशी तात्यांच्या सैन्यानं इंग्रज सैन्याच्या तंबूंवर अचानक गोळीबार सुरू केला. पुन्हा शांत राहिले. नंतर दोन दिवसांनी तात्यांनी अयोध्येकडील गंगा नदीवरचा पूल जाळण्यासाठी ज्वालाग्राही बोटी पाठवल्या. दुसर्‍या दिवशी तात्यांच्या सैन्यानं इंग्रजांच्या सैन्यावर एकाएकी इतका जोरदार गोळीबार सुरू केला की सर कोलिनच्या तळावर गडबड सुरू झाली. बराच वेळ त्यांना त्यांच्या तोफा बंद ठेवाव्या लागल्या. तात्यांच्या सैन्याच्या डावी फळीकडे खुद्द श्रीमंत नानासाहेब पेशवे उभे ठाकले.

       सर कोलिननं तात्यांच्या सैन्याचा अभ्यास करून त्यांची उजवी फळी जरा कमजोर असल्याचं बघितलं. दुसर्‍या दिवशी  तात्यांना आपला अंदाज येऊ नये म्हणून प्रथम डावीकडे तोफेचे गोळे टाकायला सुरूवात केली. तात्यांच्या सैन्याचं लक्ष तिकडे वेधून ग्रेटहेडनं मध्य फळीवर हल्ला चढवत असल्याचं भासवलं आणि अचानक उजव्या फळीवर गोरं सैन्य आणि त्यांच्या मदतीसाठी येऊन मिळालेलं शीख सैन्य तीरासारखं  मराठा सैन्यावर चालून आलं. ग्वालेरच्या सैन्यानं तोफांचा मारा सुरू केला. त्याचप्रमाणे पांड्य सेनाही बंदुकीनं गोळ्यांचा मारा करू लागले. पण पंजाबी आणि शीख सैन्य इंग्रजांच्या बाजूनं आपल्या देशवासीयांशी लढण्यासाठी सज्ज होतं. तात्यांच्या सैन्याची उजवी फळी कमजोर दिसताच शीख सैन्यानं आक्रमण केलं. सर कोलिनला वाटलं, सेनापती तात्या आता शरण येईल पण तात्या आणि त्यांचं सैन्य इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन निसटलं होतं. चिडलेला जनरल विडहॅम ब्रह्मावर्ताकडे वळला. तिथे पोचताच त्यानं तिथला महाल नष्ट केला. देवालयं उध्वस्त केली.

   ‘ अरे वा! हा कुठला कायदा? परकीयांनी आपल्या देशात घुसायचं आणि विरोध केला तर त्यांचा बिमोड करायचा, महाल तोडायचे, देवालयं नष्ट करायची, त्या देशातल्या लोकांच्या श्रध्दास्थानांना उध्वस्त करायचं? ही कोणती नीति? ’’ एक स्त्री तावातावानं बोलली.

  ‘ बरोबर ! बरोबर !’’  इतर श्रोत्यांनी तिला पाठिंबा दाखवला.

‘ पण तोडफोडीत त्यांना मदत करणारे आपले देशी शिपाईही होते. त्याला काय म्हणावं? ’’ श्रोत्यातील एकजण म्हणाला आणि तिथले श्रोते चिडले. एकच गोंधळ सुरू झाला.

   ‘ शांत व्हा ! शांत व्हा.’बुवांनी चिडलेल्या श्रोतृवृंदाला शांत करीत  म्हटलं, ‘ अंधार होऊ लागला आहे तेव्हा आज इथेच थांबू या. बुवांनी नामस्मरणाला सुरूवात केली, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल/ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल/ श्रीज्ञानदेव तुकाराम/पंढरीनाथ महाराज की जय /

     अस्वस्थ श्रोते नाईलाजानं उठले.आपल्या आपल्या घराकडे चालू लागले.

+ + + + +

आजही देवळात कालच्या इतकीच गर्दी होती. परंतु श्रोते अगदी स्तब्ध बसले होते. सर कोलिननं सेनापती तात्या टोपेंना केलेला अटकाव त्यांना पसंत नसावा असं बुवांच्या लक्षात आलं. श्रोत्यांची ही नाराजी साहजिकच होती. पण जे काही घडलं ते तसंच मांडणं बुवांना अपरिहार्य होतं. इतिहास बदलता येत नाही. बुवांनी हातातल्या झांजांचा गजर केला. हार्मोनियम वाजू लागली, तबला साथसंगत करू लागला. बुवांनी नामस्मरणाला सुरूवात केली. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल /पुंडलिकवरदा हरी विठ्ठल / श्री ज्ञानदेव तुकाराम/ पंढरीनाथ महाराज की जय/

    होऽ ऽ! श्रोतेहो, इंग्रज सीटननं दिल्लीवर पुन्हा ताबा मिळवला. तिथून निघून तो अलिगडपर्यंतचा प्रदेश शांत करीत निघाला. इकडे कानपूरहून काल्पीच्या मार्गानं वालपोल वरच्या बाजूला निघाला. वाटेत ठिकठिकाणी त्याला हिंदी सैन्याच्या टोळ्यांना तोंड द्यावं लागत होतं. इटावा शहरात इंग्रज सैन्याला थांबावं लागलं. इटावा  इथल्या एका इमारतीत तीस चाळीस हिंदी शिपाई योध्दे हातामध्ये मस्केट घेऊन सज्ज होते. इंग्रजांच्या चतुरंग सेनेला त्यांनी थोपवलं होतं. त्यांनी सतत आणि अचूक मारा चालवला होता. तीन तासपर्यंत इंग्रज त्या इमारतीला स्पर्श करू शकत नव्हते. शेवटी इंग्रजांनी त्या इमारतीपासून खड्डा खणत जाऊन तिथे सुरूंग लावला. ती इमारत क्षणात उध्वस्त झाली आणि त्याबरोबरच तात्यांच्या मनातील देशमुक्तीच्या ईर्षेनं झपाटलेले ते योध्दे शहीद झाले. सर कोलिन अयोध्येकडे निघाला तेव्हा त्याला नेपाळचा जंग बहादूर आपल्या सैन्यासह येऊन मिळाला. जंगबहादूर लंडनला जाऊन आल्यापासून इंग्रजांवर फारच खूश होता. तो लंडन इथे जाऊन आला आणि फारच प्रभावित झाला होता. हिंदी जनतेला काय हवं आहे याची तमा न बाळगता कितीतरी हिंदीवासीय इंग्रजांची पाठराखण करीत होते.

      चिडलेल्या इंग्रजांनी गावाची जाळपोळ सुरू केली. गावकर्‍यांची घरं उध्वस्त होऊ लागली. गावातील लोक हिंदुस्थानातल्या  सैनिकांना अन्नधान्य पुरवतात, त्यांना जगवतात, हे लक्षात येऊन इंग्रजांनी गावेच्या गावे जाळली. गावातल्या तरुण पुरूषांना झाडांना लटकावून त्यांना फाशी दिले, की ज्यामुळे देशातल्या जनतेत दहशत निर्माण होईल. कितीतरी दूरपर्यंत गंगा नदीचा उत्तर भाग उध्वस्त झालेला होता.

  ‘ बाई ग, त्या मेल्यांना काळीज होतं का नव्हतं? ’’

  ‘ अहो आजी, साम्राज्याच्या ईर्षेनं अंध झाले होते इंग्रज.’’ श्रोत्यांमधून एकजण बोलला. बुवांनी एक दीर्घ निश्‍वास टाकला आणि  त्यांनी निरूपण पुढे सुरू केले.



Comments

Popular posts from this blog

प्रकरण १ ले येवले मुक्कामी तात्या टोपे यांच्या जीवनकार्यावर आख्यान

प्रकरण ७ वे इस्पितळातील इंग्रजांना मारू नका’, नानासाहेबांचा हुकुम; उठावाला जोर.

प्रकरण ५ वे पेशव्यांची जनजागृती मोहीम; ३१ मे अगोदरच भडका