प्रकरण ९ वे जेनची सुटका, जानकीचा गैरसमज
प्रजातंत्राचा प्रणेता प्रकरण ९ वे जेनची सुटका, जानकीचा गैरसमज
आता इकडे तात्यांच्या घराच्या अंगणात जाऊ या. बरीच रात्र झाली. तात्या आणि त्यांच्या बरोबर एकजण तिथे आले. दोघेही खूप थकलेले होते. दुसरी व्यक्ति यवन-नववधूच्या पोशाखात होती. तिच्या चेहर्यावर घुंघट होता. दोघे पारावर बसली. त्या व्यक्तीनं तात्यांच्या खांद्यावर मान टाकली.- - दोघेही गाढ झोपले. पहाट होताच हातात पणती घेऊन जानकी अंगणात आली. हातातली पणती तुळशीजवळ ठेवली. प्रदक्षणा घालू लागली आणि तिचे लक्ष झाडाखालच्या पाराकडे गेलं. ती चपापली. तिथे तात्या झोपले होते. आश्चर्यानं उद्गारली,
‘ स्वामी ! आपण?- आणि- - दुसरा विवाह? ’’
तात्या एकदम जागे झाले. त्यांनी विचारलं, ‘ काय? दुसरं लग्न? ’’
जानकीनं तात्यांच्या शेजारच्या स्त्रीकडे पाहिलं. ती ठाम स्वरात बोलली, ‘ हो. दुसरं लग्न. हे- - हे काय आहे ?’’
तात्या हसले उत्तरले, ‘ नववधू, नववधूच्या वेषातली स्त्री. पण दुसर्याची पळवून आणली आहे.
हे उत्तर ऐकून ती अधिकच आश्चर्यचकित झाली. ‘काय? दुसर्याची वधू पळवून आणलीत? स्वामी, आपल्याला हे शोभतं का असं वागणं?- -असं करणं म्हणजे- - चांगलं का हे? ’’ जानकीनं डोळ्याला पदर लावला.
तात्या म्हणाले, ‘चांगलं का वाईट हे तीच ठरवेल. ’’
जानकीला काहीच बोध झाला नाही. आपला पती असं काही वागेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तिची नाराजी तिच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. पण सांगणार कसं? शेवटी तिनं विचारलं,
‘ अं?- - मातोश्रींना हे आवडेल?’.
तात्या सहजतेनं म्हणाले, ‘ का नाही आवडणार? माझी आई आहे ती. माझ्यावर पूर्ण विश्वास आहे तिचा.’’ डोळे पुसत जानकी मागे फिरली. तुळशीजवळ उभी राहिली. तात्या तिच्या मागे जाऊन उभे राहिले. त्यांनी हळूवार स्वरात विचारलं, ‘ काय झालं? ’’
जानकी चिडून दूर झाली. ‘हात नका लावू मला. आजपर्यंत मला आपला अभिमान वाटायचा. आपली हुशारी चातुर्य, आपला पराक्रम- - पण त्याचा उपयोग आपण असा कराल, असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं’. जानकीचा स्वर चढत होता. तिला रडू आलं. हुंदका आवरत तिनं डोळे टिपले आणि मान फिरवून उभी राहिली. तिची समजूत घालत तात्या म्हणाले,
‘ रडू नकोस जानकी. जरा हळू. ती खूप थकली आहे ग. ’’
जानकी चिडली. तात्यांकडे रोखून पहात चढ्या स्वरात म्हणाली, ‘अरे वा! बरीच काळजी आहे तिची? थकली आहे म्हणे. वा, छान. छान वाटलं हो ऐकून. ’’ येणारा हुंदका तिने आवरला. ‘देवा ! हे काय आलं माझ्या नशिबी. कुठे कमी पडले मी? ’’ रडू आवरेना.
‘ रडू नकोस जानकी.’
जानकीनं डोळे पुसत विचारलं, ‘रडण्याशिवाय विवाहित स्त्री दुसरं काय करू शकते? - - सांगा? ’’ ‘असं कसं म्हणतेस. एवढं घर संभाळतेस तू. आपली मुलं, माझे आईबाबा,- - ’’
‘ पुरे.’’ जानकी रागानं बोलली. ‘ काय उपयोग? तुम्हाला त्याचं काय? पुरूषांना आपल्या बायकोची किंमतच नसते. ती स्वत:चं आयुष्य दुसर्यांच्या सुखासाठी वाहते. त्यांच्यासाठीच झिजते. पण म्हणणारा हेच म्हणतो, विवाहित बायकोचं कर्तव्यच आहे ते. ’’
तात्या गंभीर झाले. पत्नीला सावध करण्यासाठी म्हणाले,‘हळू .जरा हळू बोल. ती जागी होईल.’’ जानकीनं तात्यांकडे रोखून पाहिलं, ‘ असं? ’’
इतक्यात जेन झोपेतून जागी झाली. तिनं हातानं चाचपडलं. तात्या नाही असं लक्षात येताच घाबरून तिनं विचारलं, ‘तात्या कुठे आहे तुमी? आपण कुठे आहो? ’’
तात्या उत्तरले, ‘माझ्या घरी. आमच्या घरी. ’’ तात्यांनी जानकीकडे पाहिलं. एकमोठा सुस्कारा टाकून जेनने घुंघट टाकून ती तात्यांजवळ येऊन उभी राहिली.
तात्या म्हणाले, ‘ ही माझी पत्नी. जानकी आणि जानकी ही जेन.’’ जानकीनं तोंड फिरवलं.
तात्या हसत हसत म्हणाले, ‘ जानकी, अग, तू समजतेस तसं काहीही नाही. ’’
जानकीचा राग अधिकच वाढला, ‘ तर, तर! या शादीच्या कपड्यांचा अर्थ मला कळत नाही का?- -वेडी आहे मी? देवा ! माझे पती इतके कसे बदलले? आता खोटंही बोलायला लागले. ’’ तिनं मान फिरवून तुळशीला हात जोडले. डोळयातले अश्रू पुसले.
‘ जानकी, जरा ऐक. ’’
‘ मला काहीही ऐकायचं नाही. ’’ जानकी आत जायला वळली. तात्यांनी तिला अडवलं, ‘ अग,, जरा समजून घे.’’ तात्या जानकीच्या जवळ गेले पण ती तोंड फिरवून त्यांच्या पासून दूर झाली.
त्या पतीपत्नीत काय झालं असावं याचा अंदाज जेनला आला. ती म्हणाली, ‘ भाभीजी, तुमचे पती, प्युअर माईंडेड आहेत. पवित्र आहेत. त्यादिवशी तात्याने सर्व इंग्रजांना बोटीतून पाठवलं, पण - पण काही डिसटंन्सवर आम्हा परदेशींवर शिपायांनी हमला केला. बोलता बोलता जेन रडू लागली. ‘ माझा टॉड मारला गेला - - ’’ जेनला रडू आवरत नव्हतं. जानकीनं न समजून भिवया उंचावून प्रश्नार्थक मुद्रेनं तात्यांकडे पाहिलं.
तात्यांनी खुलासा केला,‘ टॉड म्हणजे हिचा पती. ते दोघे हिंदूस्थानातच राहणार होते. त्यांना इथल्या चालीरिती आवडल्या होत्या. जेनला इथली माणसं आवडली होती. माणूसकी आवडली होती. ’’
जेननं एक मोठा निश्वास टाकला. ‘हम अंग्रेज है न, आमी त्या हमल्यात सापडलो. आणि- - कोणीतरी मला उचलून नेलं. कमर्यात बंद केलं. भाभीजी, तो माझ्याशी शादी करणार होता. ’’ जेनला हुंदका आवरला नाही.
‘ काय? ’’ तात्यांकडे पाहत जानकीनं विचारलं.
तात्यांनी लगेच खुलासा केला, ‘ एका यवनाबद्दल बोलत आहे ती. ’’
जेन सांगत होती, ‘ शादीची सब तैयारी झाली. मला हे कपडे नेसवले. तो पण तैयार होऊन आला. काझी आला. भाभीजी ! त्या टाईमला मला तर वाटत होतं, तुमच्या सीतेसारखं मला ही धरती पोटात घेईल तर बरं. मी डोळे मिटून घेतले. ओ गॉड ! मला वाचव. तेवढ्यात कोणीतरी म्हणालं, ’ काझी साहाब, ही यांची दुल्हन नाही. मला तो आवाज ओळखीचा वाटला. मी डोळे उघडले. आणि- -आणि समोर पाहिलं, तो काझीच्या मागे तात्या. तात्या?- - ओह, गॉड- -तात्या ! तुम? यहां? ’’
तात्यांना आश्चर्य वाटलं ‘ जेन? तू या वेशात? तू वधू? ’’
‘ मी धावत तात्याजवळ जाऊन उभी झाली. तो यवन ओरडला, तात्या सोड तिला.’’
तात्या त्याला म्हणाले, ‘अरे, तू असं काही करशील असा विचारसुद्धा कोणाच्या मनात आला नव्हता.हां- - तरुण मुलगी पाहिली की तुझं मन विचलीत होतं हे माहीत होतं, पण- तू हे असं वागशील असं वाटलं नव्हतं. ’’
तो हसत म्हणाला, ‘ लडकियां ही मेरे पिछे पिछे आती है. इसने भी निकाह के लिए सम्मति दी है. छोड दो . ’’ त्यानं जेनला आपल्याकडे ओढलं. ती तात्याला पक्कं धरून उभी झाली. ‘ तात्या छोड उसे. ’’
तात्या ठाम स्वरात उत्तरले, ‘ हे पहा जोपर्यंत ती स्वत: सांगत नाही, तोपर्यंत ती येणार नाही.
तो यवन चिडला जवळ जवळ ओरडलाच, ‘ तात्या, जादा होशियार मत बनो. छोड दो उसे. ’’
तात्या हसत हसत म्हणाले, ‘ अरे , मी तिला पकडून ठेवलेलंच नाही. तू तिचं मन वळव आणि- -
तो जेनच्या जवळ गेला.तिला दटावत म्हणाला, ‘ जेन चलो. ’’
तात्या हसून म्हणाले, ‘ उंहूं , असं नाही. हा हुकूम झाला. अनुनय नाही. जरा प्रेमानं बोल. ’’
आता मात्र तो खूपच चिडला , ‘ देखो तात्या, मझाक नही. छोडो उसे.’’ जेन तात्यांच्या आणखी जवळ सरकली आणि तिनं त्यांना घट्ट धरलं. अझिमुल्लानं हे पाहिलं मात्र तो अधिकच चिडला, ‘ तात्या, छोडो उसे. वरना हमारी आपसे लडाई होगी. और वह भी एक औरत के कारण. ’’
तात्या म्हणाले, ‘ हे पहा, मी स्त्रीसाठी कधीच लढणार नाही. हां, पण स्त्रिच्या संरक्षणासाठी नक्कीच लढेन आणि तसंही लग्नासाठी मिया बीबी दोघेही राजी हवेत. पाहिजे तर काझीसाहेबांना विचारा.’’
तो तात्यांना समजावू लागला. ‘ देखो तात्या, एक अंग्रेज औरत हमसे निकाह कर रही है यही हमारी विजय है. ’’’
तात्या हसले. पुढच्या परिणामांचा विचार न करता हा असं कसं वागू शकतो हेच तात्यांना कळत नव्हतं.
‘ असं? मग हे वीरपुरुषा ! बाहेर इंग्रज सैनिक उभे आहेत, त्यांच्यासमोर जाऊन वीरता दाखवून निकाह कर. ’’
तो घाबरला, ‘ क्या? अंग्रेज फौज? नही. ’’ पण लगेच स्वत:ला सावरत म्हणाला, ‘ देखो तात्या मझाक बहुत हुआ. सीधे क्यों नही कहते तुम जेन से प्यार करते हो. ’’
तात्यांनी होकारार्थी मान हलवली. ‘हो. कबूल. माझं जेनवर प्रेम आहे. खूप प्रेम आहे.’’ जेननं चमकून तात्यांकडे पाहिलं. तात्यापुढे म्हणाले, ‘ती माझी बहीण आहे. हो. जेन माझी बहीण आहे. ’’ आणि बोलता बोलता तात्यांनी जेनचा हात धरला आणि म्हणाले ‘ चल जेन. ’’क्षणात जेनला घेऊन तात्या वेगाने बाहेर गेले.
काय घडलं हे लक्षात येताच अझिमुल्ला ओरडला, ‘ रोको,रोको उन्हे. तात्या, यह कानपूर है. और याद रखना मै अकेला नही हूं । समझे? मै अकेला नही हूं. ’’
तात्या दूरूनच उत्तरले, ‘ मीही एकटा नाही.बाहेर माझे सैनिक आहेत. ’’ आणि घोड्यावर बसून त्यांनी दौड सुरू केली.’जानकी, मी तिथून निघालो आणि सरळ इथे आलो. जेनला बरोबर घेऊन. ’’
‘ आणि रात्रभरात इथे पोचलातही. असंच ना? ’’ जानकीनं हसून विचारलं.
‘ हो !’’ तात्या आणि जेन हसत होते.
जानकीला तात्यांचा अभिमान वाटला. ती म्हणाली,‘ स्वामी, फार बरं केलंत. शेवटी एका स्त्रिच्या अब्रूचा प्रश्न होता. ’’
जेन म्हणाली, ‘भाभीजी, तुमी खूप नशीबवान आहात तुमाला असा हसबंड मिळाला. तात्या, तुमचे उपकार आहेत माझ्यावर. आज माझा टॉड असता तर- - ’’ सगळेच गंभीर झाले. क्षणापूर्वी सगळे हसत होते. पण- - इतक्यात बाहेर कोंबडा आरवला.
जानकीनं सुचवलं, दिवस निघत आहे. आपण घरात चलावं. जेन. ’’
जेन पटकन म्हणाली, ‘नको भाभीजी, रातभर माझी रेस्ट झाली. आता माझ्यामुळे तुमच्यावर पुन्हा काही संकट आलं तर? नो. थँक्स- - तात्या,मला लवकरात लवकर हॅवलॉकच्या छावणीत पोचवा. शायद ते लोग इथे जवळच असतील. ’’
तात्यांना जेनचं म्हणणं पटलं, ‘ ठीक आहे. चल. ’’ तात्या आणि जेन जायला वळणार तोच जानकी जेनला आपादमस्तक न्याहाळत म्हणाली, ‘ थांबा. मला वाटतं यांचं ह्या वेशात जाणं योग्य नाही. धोका होऊ शकतो. ’’ तात्या विचारात पडले.
जेन घुटमळत म्हणाली ‘ हां- - पण- - ’’ पण तिला काही बोलू न देता जेनचा हात धरून जानकी तिला घरात घेऊन गेली. काही न समजून तात्या पहात राहिले. आपल्या पत्नीच्या मनात काय आहे ते त्यांना उलगडत नव्हतं. ते आस्वस्थपणे फेर्या मारू लागले.
काही वेळानंतर जेन आणि जानकी बाहेर आल्या.जेनने नऊवारी पातळ नेसलं होते. तात्या आश्चर्यानं पहातच राहिले.
जेननं नेसलेल्या लुगड्याकडे पहात विचारलं, ‘तात्या,कशी दिसते मी? ’’
तात्या हसले. कौतुकानं म्हणाले , ‘वाह! सांगू? एखाद्या हिंदुस्थानी स्त्रीसारखी दिसतेस. ’’’
जेन सांगत होती,‘ भाभीजी म्हणाल्या, आता तुला कोणी ओळखणार नाही. तात्या, मला हा पेहराव खूप आवडला. मला हा देश आवडतो. इथली माणसं फार आवडतात. ’’
पण तात्यांचं जेनच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं, पत्नीकडे पहात ते बोलत होते. ‘जानकी, तू तर माझ्याही पुढे गेलीस. खरं म्हणजे तुझ्या मोठेपणामुळे माझा गौरव होतो. म्हणात ना, स्त्रीशिवाय पुरुष अपूर्ण आहे, ते काही खोेटं नाही. परमेश्वरा तुझी केवढी कृपा. या सामान्य माणसाच्या जीवनात साथ द्यायला जानकीसारखी असामान्य स्त्री पत्नी म्हणून दिलीस. ती माझ्या वृद्ध मातापित्यांची मनोभावे सेवा करते. मनू ,सखाराम या आमच्या मुलांचं संगोपन करते. त्यांचे हट्ट पुरवते. चांगलं काय वाईट काय ते सांगते. स्वसंरक्षणाच धडे देत. येणार्या अतिथींचं आगत स्वागत करते. आत्ता ह्या जेनला कोणी ओळखू नये, तिच्यावर संकट येऊ नये म्हणून वेशांतर करायला लावलं.’’ बोलता बोलता तात्या तुळशीजवळ गेले आणि हात जोडून म्हणाले, ‘ हे तुळशीमाते, जन्मोजन्मी मला हीच पत्नी लाभू दे. ’’
पुरे. पत्नीचं स्तुतीपुराण पुरे.’’ जानकीला संकोचल्यासारखं झालं. ‘ हे बघा, लवकरच उजाडेल, तेव्हा आता आत तरी या, नाहीतर- - ’’
तात्या जेनला घाई करत म्हणाले, ‘हो, हो. जेन चल लवकर.’’ तात्यांनी दोघांचे घोडे तयार केले आणि दोघेही जायला निघणार इतक्यात जेननं मागे वळून तुळशीमातेकडे आणि जानकीकडे पहात हात जोडले. जानकीनं स्मित करीत हात जोडले. ती जाणार्या त्या दोघांकडे पहात उभी होती. तिच्या मनात राहून राहून येत होते, ’ आपण उगीचच आपल्या पतीवर संशय घेतला. खरं तर चुकलंच आपलं. आपण आधी त्या स्त्रिविषयी माहिती करून घ्यायला हवी होती. त्यांनी तिला संकटातून सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आपण, कसं वागलो? त्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करून मोकळे झालो. नाही, नाही. हे चुकलंच’ जानकी तुळशीसमोर हात जोडून उभी राहिली, डोळे मिटले आणि म्हणाली, ’ हे तुळशी माते मला क्षमा कर. फार मोठा अपराध माझ्या हातून घडला आहे. मी माझ्या निष्कलंक पतीवर संशय घेतला. काय करू? कोणतं प्रायश्चित्त घेऊ म्हणजे हे पाप धुतलं जाईल?’
तात्यांनी जेनला हॅवलॉकच्या छावणीपासून दूर अंतरावर सोडलं आणि ते गेल्यापावली परत फिरले. तिथून तात्या तडक पेशव्यांच्या वाड्यावर पोचले. ते जरा चिडलेलेच होते. पेशव्यांसमोर उभं राहून बोलू लागले, ‘ स्वामी, युध्दात शत्रूच्या स्त्रियांना पळवून नेणं, त्यांच्याशी निकाह करणं, त्यांच्यावर बळजोरी करणं, सयुक्तिक वाटत नाही. तात्यांचा आवेश पाहून नानासाहेब उमजले की काहीतरी वेगळंच घडलं आहे. त्यांनी त्या गोष्टीची चौकशी करून गोर्या आणि इतर स्त्रियांना पळवून नेणार्यां लोकांची निर्भत्सना केली. त्या स्त्रियांची सुटका करून त्यांना पळवून नेणाऱ्यांना कैदेत ठेवलं.
Comments
Post a Comment