प्रकरण ६ वे ‘दिल्लीत गर्दी नको, आपण कानपुरातच थांबू’, नानासाहेब.

                       प्रजातंत्राचा प्रणेता      प्रकरण ६ वे        ‘दिल्लीत गर्दी नको, आपण कानपुरातच थांबू’, नानासाहेब.

इकडे देवळात आळेकर बुवांनी सांगायला सुरुवात केली, सकाळची मंगल वेळ. तात्यांच्या घराची ओसरी, समोर तुळशी वृंदावन. आजूबाजूला वृक्ष. फुलझाडं. एका वृक्षाखाली पार बांधलेला. सडासंमार्जन आटोपून तात्यांची पत्नी जानकी हातात पूजेचं तबक घेऊन अंगणात आली. तुळशीची पूजा केली. तेवतं निरांजन तुळशीपुढे ठेवलं. जानकीनं हात जोडून डोळे मिटले आणि ती म्हणू लागली--

शुभम् करोती कल्याणम्, आरोग्यम् धनसंपदा!
 शत्रूबुद्धी विनाशाय, दीपज्योती नमोस्तुते!!
हे तुलसी माते, माझ्या पतींच्या चातुर्याचं, पराक्रमाचं तेज ह्या ज्योतीसारखंच कायम राहो. तिने नमस्कार केला.

इतक्यात मागून हळूच हाळी आली,‘ जानकी ! ’’

   जानकी दचकली. ‘  अरे, स्वामी, आपण? आपण केव्हा आलात?  ’’

तात्या हसले. म्हणाले, ‘तू ह्या तुळशी मातेजवळ माझ्यासाठी आशीर्वाद मागत होतीस तेव्हाच. जानकी खरं सांगू? तुझ्या ह्या भक्तिमुळेच मला शक्ति येते.’’

जानकी लाजून चूर झाली. ‘पुरे. काहीतरीच काय ! ’’

‘जानकी, खूप आठवण येते आमची?’’, तात्यांनी हसत विचारलं.

    ‘आपण माझे पती आहात, आठवण तर येणारच. पण- - ’’ जानकी रूसून बोलू लागली. ‘आपण मात्र आम्हाला विसरता. त्या अझिजच्या तुलनेत ही नाचिज...म्हणजे... ’’

तात्या मोठ्याने हसले. ’हंहं.. अझिजजान, .--अशी खूबसुरती मी तोपर्यंत कधी पाहिलीच नव्हती.

‘  वा;! यालाच आरसपानी सौंदर्य म्हणतात का? पौर्णिमेच्या चंद्रासारखा गोल चेहरा, गोरापान रंग. कमळाच्या पाकळी सारखे डोळे. नाजुक, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ. तीही माझ्याकडे एकटक पहात होती. ’’ तात्या बोलत होते  आणि डोळ्यांच्या कोपर्‍यातून पत्नीचा चढत चाललेला पारा पाहून मनातल्या मनात हसत होते. जानकीनं तोंड फिरवलं. तात्या सांगतच होते. ‘आपल्या मधाळ स्वरात ती उद्गारली, अहाहा !आप सचमुच योद्धा हो. हे पिळदार शरीर, चेहर्‍यावरचं तेज. आपको देखतेही मैने जान लिया आपही पेशवा हो.. .नानासाब. ’’

   ‘म्हणजे? ती? ’’  काहीच न उमजून जानकीनं विचारलं.

    ‘ अग, ती  नानासाहेबांना भेटायला  आली होती. मी तिथे पाठमोरा उभा होतो. ती मलाच पेशवा समजली.

जानकी खुदकन् हसली. ‘काय? आपल्याला पेशवा समजली? ’’

     ‘ हो. पण मी तिला लगेच सांगितलं, नानासाहेब आत बसले आहेत. मी तात्या, त्यांचा  बालमित्र आणि स्वामींचा एकनिष्ठ सेवक. ’’

जानकीनं मोठा सुस्कारा सोडला. ‘ बरं झालं बाई, आपण लगेच सांगून टाकलं. पण ती नर्तकी पेशव्यांना भेटायला कशाला आली होती? तेही कानपूरहून ब्रह्मावर्ताला? ’’

     ‘नानासाहेबांकडे. इंग्रजांनी तिकडे कानपूरला ठेवलेला इंग्रजांचा बारा लाखाचा खजिना संभाळण्याची जबाबदारी टाकली होती. त्यांचं पेशवपद गेल्याची बातमी अझिजजानला कळली, म्हणून ती आली होती. तिने त्यांना स्पष्टपणे सांगितलं,

   ‘ अंग्रेजोनने आपका घात किया, फिरभी आप उनकी सेवा करना चाहते हो? आप उनका घात कर सकते हो. हम चाहते है के कानपूर का राज आपके नाम घोषित किया जाय. ’’

    ‘हं ! --पण नानासाहेबांनी अनुमती दिली नाही. असंच ना? ’’

तात्यांना आश्‍चर्य  वाटलं.  ‘जानकी ! तुम्हाला  कसं माहीत? ’’

  ‘मग? आपली पत्नी आहे म्हटलं मी. इतकी वर्ष आपल्याबरोबर राहते आहे, इतकंही नाही शिकणार का? पण मला आश्‍चर्य वाटतं ते स्वारीच. आपल्यासारखा स्वातंत्र्ययोद्धा गप्प राहिला?  ’’

     कोणी सांगितलं मी गप्प राहिलो म्हणून? मी नानासाहेबांना सांगितलं, आपण त्या कलेक्टरला सांगून टाका की आता ही जोखीम आमच्यावर नको. तुम्ही तुमचा खजिना सांभाळा. पण मी काही बोलणार तेवढ्यात बाहेरून सेवक म्हणाला, ‘क्षमा असावी, ’’घाबरल्यामुळे त्याचा स्वर थरथरत होता. तो सांगायला लागला, ‘आपले शिपाई इग्रजांच्या विरूद्ध उठले आहेत. ओरडत आहेत, इंग्रजांची घरं जाळून टाका, दुकानं लुटा. अशा घोषणा देत आहेत, नानासाहेब झिंदाबाद ! अझिजजान झिंदाबाद ! नानासाहाब पेशव्यांचा जयजयकार !  ’’            

    ‘काय?’’ तात्या  आश्‍चर्याने जवळजवळ ओरडलेच. तात्यांनी विचारलं, ‘ नानासाहेब पेशव्यांचे घोडेस्वार पहार्‍यावर होते ना ? ’’उत्तराची वाट  न पाहता तात्यांनी आपला टोप चढवला आणि ते  तडक नानासाहेब पेशव्यांच्या वाड्याकडे निघाले. तात्या वाड्यावर पोचले.

    नानासाहेब अस्वस्थपणे फेर्‍या मारीत होते. शेजारी रावसाहेब उभे होते .

     श्रीमंत नानासाहेब बोलत होते, आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून.देवा ! आता त्या इंग्रजांना कसं तोंड दाखवू ? कोणत्या तोंडानं सांगू की, हा पेशवा तुमचा खजिना संभाळू शकला नाही. आमच्याबद्दल काय वाटेल त्यांना? आम्ही गद्दार...धोकेबाज... दगाबाज...
      तात्या पुढे झाले,मुजरा करून म्हणाले, ‘ स्वामी, आपला सेवक असूनही बोलतो म्हणून रागावू नये, पण-पण-दगाबाजी आपण आपल्या देशवासीयांशी करत होता. त्यांनी आपल्याला आपला योग्य मार्ग दाखवलेला आहे. स्वामी, स्वातंत्र्यासाठी तळमळणार्‍या या शूर देशवासीयांच्या भावना जाणा. आपण त्यांना जवळ करावं. वाड्याबाहेर नानासाहेब पेशव्यांच्या नावाचा जयजयकार ऐकू येऊ लागला आहे, तो बघा.

 नाना उठून उभे राहिले. ‘तात्या, देशवासी आजही आमच्यावर तेवढंच प्रेम करता आहेत? त्यांची आमच्यावर आजही तेवढीच निष्ठा आहे?  ’’

   ‘  अर्थातच ! ’’  तात्या.

   ‘  आजही त्यांचा पेशव्यांवर तेवढाच विश्‍वास आहे? ’’   रावसाहेबांनी विचारलं.

तात्या म्हणाले, ‘आहेच. शंकाच नको. ’’

नानासाहेबांचा चेहरा निश्‍चयी दिसू लागला. म्यान केलेल्या तलवारीवर हात ठेवून ते म्हणाले ‘ तात्या, आपण आत्ताच्या आत्ता कानपूरकडे जायचं. चला.’’

पेशवे निघाले त्यांच्या पाठोपाठ तात्या आणि रावसाहेब निघाले.

        तिथे पोचताच नानासाहेब पेशवे शिपायांसमोर जाऊन उभे ठाकले आणि उंच स्वरात बोलू लागले.

    ‘ बंधूंनो, परमेश्‍वरानं ह्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवलेली दिसते. आता आम्ही मागे हटणार नाही. इंग्रजांना बाहेरचा रस्ता दाखवू तेव्हाच स्वस्थ बसू. आपलं हे युद्ध सत्यासाठी आहे. बंधूनो, म्यान झालेल्या आपल्या तरवारी बाहेर उपसा आणि शपथ घ्या.’’  शिपायांच्या तलवारी बाहेर तरवारी उपसल्याचा आवाज आला. नानासाहेब पुढे बोलत होते, आपण शपथ घेऊ या,

‘ आम्ही या देशाचे शिपाई आहोत. आमचा देश पूर्णपणे स्वतंत्र झाल्याशिवाय आमच्या म्यानाबाहेर आलेल्या तलवारी पुन्हा म्यान होणार नाहीत. हर हर महादेव!  ’’

   समोर असलेल्या शिपायांकडून सामूहिक स्वरात प्रतिसाद आला, ‘ हर हर महादेव! हर हर महादेव! हर हर महादेव ! सर्व दिशांतून हाच आवाज  घुमू लागला.

याचवेळी अझिमुल्लाच्या स्वरात आवाहन ऐकू आले, ‘ चलो  दिल्ली !’’ सामूहिक स्वरात घोषणा आल्या,

    ‘ चलो दिल्ली. नानासाब की जय हो ! ’’ सर्वत्र गोंधळ सुरू झाला. पेशवे तडक त्यांच्या महालात गेले. अचानक असं काही ऐकून नाना अस्वस्थ झाले. दिङ्मूढपणे विचार करू लागले. त्यांनी सेवकाला फर्मावलं, अझिमुल्लाखानला बोलवा. अझिमुल्लाखान आत आले, मुजरा करीत उभा राहिले. ‘स्वामी, आपण मला बोलावलं? ’’

        ‘ अझिमुल्लाखान, हे काय केलंत? ’’ नानासाहेबांनी विचारलं.

अझिमुल्लाखान ठाम स्वरात म्हणाले, स्वामी, मला वाटतं आपण दिल्लीकडे कूच करायलाच हवं. अभी के अभी. ’’

        ‘ नाही,  अझिमुल्लाखान, आत्ता नको. ही घाई होईल. तुम्हाला त्यांना अडवता आलं तर पहा.’’  नानासाहेबांचा स्वर शांत होता.

        ‘  स्वामी, अब सिपाहीयों को काबू मे रखना मुश्किल है.’’ अझिमुल्लाखान उत्तरला.  ‘ सब एक होकर बाहर खडे है.  ’’

   पेशवे विचारात पडले. मनाशी काहीतरी ठरवून म्हणाले, ‘ ठीक आहे.’’ बाहेर गेले. तिथे जमलेल्या कानपूरच्या शिपायांच्या समुदायाला उद्देशून म्हणाले, ’आपण  दिल्लीकडे कूच करू. चालून जाऊ. आत्ताच्या आत्ता. शिपाई घोषणा देऊ लागले. ’ नानासाब की जय.’ सैन्य पुढे पुढे चालू लागलं.

  अंधार पडू लागला म्हणून नानासाहेबांनी थांबण्याचा निर्णय घेतला. राहुट्या पडल्या. पलिते पेटत होते. जिकडे तिकडे जंगल होतं. बाहेर आणि मनातही अंधार पसरलेला होता. पहाटेसच नानासाहेब उठले बाहेर एका झाडाच्या पायथ्याला बुंध्याला टेकून बसले. जरा वेळानं तात्या नदीवरून हातपाय धुवून पुसत पुसत नानासाहेबांजवळ येऊन मुजरा करून उभे राहिले.

नानासाहेबांनी विचारलं, ‘तात्या, कुठवर आलो आपण? ’’

    ‘काल रात्रीपर्यंत तीनचार कोसच आलो आहोत. अजून  दिल्ली खूप दूर आहे. ’’

निश्‍वास टाकत नानासाहेब उठून उभे झाले. ‘ हूंऽऽ. तात्या, आम्हाला वाटतं  लवकरच पुढे कूच करावं. ’’

तात्या काहीही न बोलता स्तब्ध उभे होते. ते पाहून नानासाहेबांनी एकदा त्यांच्याकडे निरखून पाहिलं. तात्यांच्या मनात काहीतरी विचार घोळत असावेत, हे नानासाहेबांनी ओळखलं. त्यांना बोलतं करण्यासाठी ते म्हणाले, ‘तात्या, मनात असेल ते बोलून टाका.’’

      क्षणभर विचार करून तात्या सांगू लागले, ‘ स्वामी, नदीवर आलेल्या लोकांकडून कळलं की, मेरठ, फिरोजपूर, मुरादाबाद, बुलंदशहर, लखनऊ, मथुरा आणि कितीतरी शहरातून आपले देशी शिपाई दिल्लीकडे जात आहेत. स्वामी, माझ्या मनात राहून राहून एकच विचार घोळतो आहे, अशा वेळी आपणही आपलं सैन्य घेऊन तिथे दिल्लीत गेलो तर त्यांच्या खाण्यापिण्याची सोय कशी करणार? राहण्याची सोय झाली तरी खूप आहे. म्हणजे मला असं वाटतं  की- ’’

नानासाहेब विचारात पडले. ‘ खरं आहे पण-मेरठ एकदम का पेटलं? - ’’

        ‘स्वामी, बंगालमध्ये मंगल पांडेला आणि बराकपूरला देशी शिपायांना इंग्रजांनी फाशी दिलं आपली लखनौ भेट. शिवाय आपण  कमळं, चपात्या पाठवून जो संदेश पाठवला, त्यामुळे पेशव्यांसारखा शूरवीर आपल्या पाठीशी आहे, आपल्याला नेता मिळाला, हे पाहून लोकांचा आत्मविश्‍वास वाढला असावा. या देशातल्या सामान्य जनतेला स्वातंत्र्याची आस आहेच त्यातून  आपलं छत्र शिरावर आहे हे कळताच त्यांचा विश्‍वास दुणावला स्वामी, आपलं कर्तृत्व महान! ’’

‘ तात्या, पुरे. किती स्तुती कराल? ’’  नानासाहेब हसून म्हणाले.

    नानासाहेब पुढे काही बोलणार तोच त्यांना अझिमुल्लाखान येताना  दिसले, ते स्तब्ध झाले.

अझिमुल्लाखानाने मुजरा केला आणि तो उत्साहानं म्हणाला, ‘स्वामी, आगे कूच करने के लिए सिपाही तैयार है.’’

नानासाहेब म्हणाले ,  ‘ अझिमुल्ला, आपण आत्ता  दिल्लीला जाऊ  नये असं आम्हाला वाटतं. ’’
 
तो आश्‍चर्यानं जवळजवळ उडलाच.  ‘  क्या?  दिल्ली  नही जाएंगे तो करेंगे क्या? ’’

नानासाहेब शांत स्वरात उत्तरले, ‘  कानपूरला परत जाऊ. ’’

अझिमुल्लाखानाचा स्वर किचित् चढला, ‘ नही ऐसा नही हो सकता.’’ पण लगेच स्वत:ला सावरत त्यानं म्हटलं, ‘हुजूर,अब ये नामुमकीन है।’’ नानासाहेबांनी तात्यांकडे कटाक्ष टाकला.

अझिमुल्लाखानाला समजावण्याच्या स्वरात तात्या म्हणाले, ‘अझिमुल्लाखान जरा विचार करा. देशभरातून ठिकठिकाणाहून सैनिक  दिल्लीकडे निघाले आहेत. आपले सैनिकही तिथे जातील. सर्व देशातले सैनिक जर तिथे एकत्रित झाले  तर इंग्रजांचं काम खूपच सोपं होईल. नाही का?  ’’

अझिमुल्ला खूपच चिडला. मान हलवत म्हणाला, ‘ अच्छा तो दिल्ली न जाने की बात आपके दिमाग से आई है ।  ’’

नानासाहेब एकदम रागावून म्हणाले, ‘अझिमुल्ला, काय बोलता? तेही आपल्याच माणसाबद्दल? ’’

    ‘ गलती हुई स्वामी. लेकिन अब उन सिपाहियोंको समझाएगा कौन? क्या वह मानेंगे? ’’ नानासाहेबांनी तात्यांकडे पाहिलं.

तात्यांनी नम्रपणे सुचवलं, ‘ आपण आमचे स्वामी आहात. आपल्या शब्दाला वजन आहे. आपण समजावून सांगितलं तर आपला  शब्द  ते खाली पडू देणार नाहीत. ’’

        नानासाहेबांनी मान डोलावली. ते बाहेर जाऊन सैनिकांसमोर उभे राहिले आणि सांगू लागले,

‘ सैनिकांनो! दिल्लीत आपल्या देशातून ठिकठिकाणाहून आपले लाखो सैनिक कूच करताहेत. एकदम इतके सैनिक एकत्रित झाले तर त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होतील. अशातच आपणही तिथे गेलो तर खाणार काय? पाणी तरी मिळणार का? अहो, पाय ठेवायला जागा तरी मिळणार का?’’ तात्यांकडे कटाक्ष टाकला.

बाहेरचा जमाव सम्मिलीत स्वरात ओरडला, ‘अझिमुल्लाखान, कोई बात नही, कोई बात नही.  ’’

    त्यांना थांबवत नानासाहेब पुढे बोलू लागले, ‘याशिवाय आणखी एक गोष्ट. विचार करा. आपलं देशभरातलं सैन्य दिल्लीतच जमलं तर इंग्रजांना हमला करून आपला पाडाव करणं सोपं जाईल. त्यापेक्षा आपण कानपुरातच राहू. हम वहीं दटे रहेंगे. आपली ताकद वाढवू. आणि मग दिल्लीचा विचार करू. तुम्हाला काय वाटतं? ’’

जमाव  एक स्वरात म्हणाला, ‘सच है. सच है. हम कानपूर वापस जाएंगे . चलिये . हर हर महादेव! हर हर महादेव!’’ घोषणा देत देत नानासाहेबांचं सैन्य मागे परतलं.

                          +++++


Comments

Popular posts from this blog

प्रकरण १ ले येवले मुक्कामी तात्या टोपे यांच्या जीवनकार्यावर आख्यान

प्रकरण ७ वे इस्पितळातील इंग्रजांना मारू नका’, नानासाहेबांचा हुकुम; उठावाला जोर.

प्रकरण ५ वे पेशव्यांची जनजागृती मोहीम; ३१ मे अगोदरच भडका