प्रकरण १३ वे राणीला वीरमरण, मानसिंगाचे आगमन, गनिमी युद्धतंत्राचा वापर

              प्रजातंत्राचा प्रणेता       प्रकरण१३ वे    राणीला वीरमरण, मानसिंगाचे आगमन, गनिमी युद्धतंत्राचा वापर

   तिकडे आग्र्याला गेल्यावर ग्वालेरचे राजे जयाजीराव शिंदे महाराज आणि दिनकरराव दिवाण यांनी इंग्रज साहेबाला सर्व हकिगत सांगितली. ह्यूरोजने आपल्या उत्कृष्ट  सेनेचे अधिपत्य स्वीकारून ग्वालेरवर चाल केली. पळून आलेले जयाजीराव शिंदे,दिनकरराव दिवाण त्यांच्याबरोबर होतेच. ग्वालेरच्या लोकांसाठीच आपण लढत आहोत असे भासवून त्यांनी स्वामीनिष्ठ भोळ्या ग्वालेरवासी शिपायांत फूट पाडली. दिनकरराव म्हणाले, तात्या, स्वत:ला फार शहाणे समजतात. पण सैनिकहो, लक्षात घ्या इंग्रज तुमच्यापेक्षा चतुर आहे. सुभेदारांच्या बोलण्याला तुम्ही फसलात. त्यांनी शिंदे सरकारांच्या सैन्याला पुढे पाठवलं. त्यांनी तुम्हाला हरवलं. अहो! शिंदे सरकारांचं सैन्य आपल्या धन्याला बेईमान कसं होईल? त्यांचं नमक खाल्लं आहे त्यांनी. तुम्ही बघतच रहा. हळूहळू सर्व संस्थानं आपली राज्य इंग्रजांच्या हातात सोपवतील. हंऽ. आणि तेच ठीक आहे. उगीच युद्धं कशाला करायची? करू दे इंग्रजांना राज्य. आपण आरामात आयुष्य घालवू.

       हे सांगता सांगता आळेकर बुवांनी निराश स्वरात नामस्मरणाला सुरूवात केली.-

         विठ्ठल विठ्ठल विठ्ठल/ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल/ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल/

     इंग्रजांना हेच हवं होतं. देशातल्या जनतेत फूट पडली की हाती असलेलं राज्य जाण्याची भीति नाही. इंग्रजांनी फौज गोळा केली. ह्यूरोज ग्वालेरकडे गेला आणि स्मिथ झाशीकडे. गावातले लोक विरोध करताहेत असं वाटताच त्याने गावातल्या लहान मोठ्या पुरुषांना मारलं. घरं जाळली. सगळी जनता सैरभैर झाली. नंतर स्मिथनं आपला मोर्चा झाशीच्या किल्याकडे वळवला. आकाश धुरानं, धुळीनं भरलेलं, झाशीची राणी शर्थीने लढत होती. वातावरण निनादानं, गर्जनांनी भरून गेले. स्मिथने वारंवार राणीच्या सैन्यावर मारा केला. पण राणीने फळी फुटू दिली नाही. स्मिथ मागे हटला पण पुन्हा आणखी सबळ कुमक घेऊन चाल केली. झाशीच्या राणीचे शिपाई धारातीर्थी पडू लागले. मात्र जे होते ते शर्थीने लढत होते. हार्मोनियमनं सूर दिला बुवा गाऊ लागले,-
सिंहासन हिल उठे, राजवंशने भुक्रुटी तानी थी/
बुढे भारत मे भी, आई फिरसे नयी जवानी थी/

       पण हाय रे दुर्दैवा! स्मिथने पिछाडीकडून किल्यावर हल्ला केला. इंग्रज सैनिक आत शिरले, राणीचं सैन्य उधळू लागले. झाशीच्या राणीच्या तोफा निष्फळ झाल्या.

    बुवा निराश स्वरात गाऊ लागले,
आज का निष्फळ होती बाण/
पुण्य सरे का सरले या भाग्याचे वाण?//

  झाशीच्या राणीनं ठरवलं. इंग्रजांच्या हातून मरण येऊन विटंबना होण्यापेक्षा तिथून निघून जावं. पंधरा ते वीस घोडे स्वार, दोन दासी बरोबर घेऊन राणी शत्रूचा कोट फोडून निघाली. फिरंग्याना हे समजताच ते तिचा पाठलाग करीत निघाले. थोडे दूर गेल्यावर एक दासी ओरडली. ‘ मेले! मेले !! ’’ राणी चवताळून मागे वळली. तिने त्या फिरंग्याला यमसदनाला पाठवलं आणि परत जायला वळली, घोड्याला टाच दिली. पण- पण, पुन्हा दुर्दैव आड आलं. तिचा घोडा समोरच्या ओढ्यावरून उडी घेईना. फिरंगी पाठीशी होतेच. ते तिच्या वर तुटून पडले. अनेक तलवारींशी एक तलवार भिडली. खड खडाखड .पण एका फिरंग्यानं  राणीवर मागून वार केला. तिच्या मस्तकाचा काही भाग छिन्नभिन्न झाला.एक नेत्र बाहेर येऊन लोंबू लागला. पण त्याही स्थितीत त्या शूरवीर राणीनं त्या सार्जंटचा चुराडा केला. इमानी रामचंद्रराव मागे होतेच, राणी शेवटचे श्‍वास घेत आहे असं दिसताच त्यांनी तिला जवळच्या पर्णकुटीत नेलं. गंगादास बाबांनी तिच्या मुखात शीतजल दिलं. आणि-आणि त्या रणलक्ष्मीचा आत्मा तिच्या मृण्मय देहपिंजर्‍यातून उडून गेला.
सिंहासन हिल उठे

         डोळ्यातले अश्रू पुसत सांगत होते, कवयित्री सुभद्राकुमारी लिहितात,

                बुवा गाऊ लागले -
दिखा गयी पथ, सिखी गयी हमको/
जो सीख सिखानी थी/

                 बुंदेलो हरबोलो के मुख हमने सुनी कहानी थी/

                              खूब लढी वो मर्दानी झाशीवाली रानी थी /

   देवळातल्या प्रत्येकाचा ऊर दु:खानं भरून आला. तिथे नि:शब्द शांतता पसरली. बुवा सांगत होते, कवी भा.रा.तांबे लिहितात, दु:खी स्वरात बुवा  गाऊ लागले,- रे हिंद बांधवा थांब या स्थळी/ अश्रू दोन ढाळी /

                          ती पराक्रमाची ज्योत मावळे/ इथे झाशीवाली //

       देवळातले श्रोते डोळे पुसत होते. हुंदक्यांचा पुसटसा  आवाज ऐकू येत होता.

      +++++

   ग्वालेर, झाशी इथं पराजय पदरी आला पण तात्या डगमगले नाहीत. उरलंसुरलं सैन्य घेऊन तात्या आणि रावसाहेब समरथुरा  गावाकडे गेले. रावसाहेब उदास झाले होते. नानासाहेब पेशवे त्यांना दुरावले होते पण फक्त शरीरानं ते दूर गेले होते, मनानं नाही. देशाच्या स्वातंत्र्या साठी तेही तळमळत होते. श्रीमंत नानासाहेब पेशवे सैन्याची एक तुकडी घेऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी दुसरीकडे लढणार होते. सर्वजण एकत्रच राहिले तर त्यात शत्रूचा फायदा होईल हा विचार त्यांनी मांडला आणि ते दुसरीकडे गेले.

रावसाहेबांनी उदास स्वरात तात्यांना विचारलं, ‘ तात्या, मनू गेल्याचं दु:ख नाही होत तुम्हाला?’’

तात्या उत्तरले,‘ रावसाहेब वीरमरण आलं तिला. झाशीची राणी होती ती. शूरवीरांनी वंदन करावं अशी योग्यता तिची.. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ती राणी प्राणपणानं लढली. ’’

रावसाहेब म्हणाले, ‘ खरं आहे. पण वारंवार एकच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. आपल्यासाठी लढणारे शहीद होताहेत. शिवाय कितीतरी देशवासी परदेशीयांना शरण जाताहेत.’’

    तात्या खंबीर स्वरात म्हणाले,‘ रावसाहेब हिंमत नका सोडू. आपण ह्या जंगलात आलो तेव्हा आपल्याला वाटलं आपण एकटेच आहोत, पण नाही. इथले भिल्ल आपल्या पाठीशीआहेत. शिवाय दोनतीनशे सैनिक आपल्या पाठोपाठ आले. मी त्यांना सांगितलं, मित्रांनो, हार पत्करावी लागली तरी खचू नका. पुन्हा खंबीरपणे उभे रहा. परमेश्‍वर तुम्हाला आशीर्वाद देईल. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण लढत आहोत. रावसाहेब, मी सदैव एकच स्वप्न पाहतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न. या देशाच्या स्वातंत्र्याचं स्वप्न. हे स्वप्न मला धैर्य देतं. शक्ति देतं. आपणही तेच स्वप्न पहावं, ते स्वप्न उराशी ठेवलंत तर आपल्यालाही जगण्याची,लढण्याची उमेद येईल.’’

रावसाहेब  खिन्नपणे हसले, ‘ तात्या, हे स्वप्न उराशी बाळगूनच आम्ही कितीतरी आक्रमणं केली पण, पण प्रत्येक वेळी माघार घ्यावी लागली.

तात्या उत्तरले, ‘ हां ऽ, स्वामी, असं नका म्हणू. आपल्या देशातले नबाब, राजे यांनी आपल्याला धोका दिला,पण त्यांच्या सैनिकांनी आपल्यासाठी, देशासाठी त्यांना दगा दिला. कारण देशाच्या स्वातंत्र्याचं महत्त्व त्याची प्रजा जाणते. सैनिक जाणतात. निदान त्यांच्यासाठी तरी आपण लढायलाच हवं.’’

    ‘ पण असं कुठपर्यंत चालणार? दक्षिणेत निजामानं आपल्याला साथ दिली नाही.’’रावसाहेबांनी विचारलं.

   तात्या उत्तरले, ‘ खरं आहे. निझाम अफजुल उल उदौलाच्या शिपायांनी फिरंग्यांना या देशातून हुसकावून लावण्याच्या शपथा घेतल्या होत्या. दीन, दीन म्हणत त्या शिपायांनी ब्रिटिश रेसिडेन्सीवर हल्ला चढवला. तात्यांनी एकदीर्घ नि:श्‍वास टाकला. ‘पण निझामाचा दिवाण सर सालारजंग इंग्रजांना जाऊन मिळाला होता. स्वत:च्या स्वार्थासाठी त्यानी राज्यातील प्रजेला इंग्रजांच्या स्वाधीन केलं. हैद्राबाद जवळ असलेल्या झोरापूर संस्थानच्या तरुण हिंदुराजानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणानं लढण्याचं ठरवलं. नानासाहेबांचे दूत त्याच्याकडे आले होते. त्या राजानं अरब, रोहिले, पठाण आणि डोंगरी लोकांचं सैन्य उभं केलं. परंतु प्रबळ शत्रूपुढे उभं राहण्याचं धैर्य त्याला होईना. त्याची प्रजा त्याला भित्रा म्हणू लागली ते पाहून त्यानं पेशव्यांच्या नावानं उठाव केला. ’’

       ‘ पण  निझाम आणि इंग्रज यांच्या शक्तीपुढे तो टिकला नाही असंच ना?’’ रावसाहेबांनी विचारलं.

‘ तात्या, मला तेच म्हणायचं आहे की, आपल्या देशातले सर्व संस्थानिक, जमीनदार वगैरे एकजुटीनं उभे राहिले तरच इंग्रजांना नामोहरम करता येईल. पण तसं होत नाही. देशाच्या स्वातंत्र्याचं महत्त्वच कोणाच्या लक्षात येत नाही आणि ते दुर्दैव.’’  रावसाहेबांच्या स्वरातील नैराश्य तात्यांना जाणवलं.  त्यांना समजावत तात्या म्हणाले, ’स्वामी, आपलं म्हणणं खरं आहे. तेच तर फार मोठं दुर्दैव आहे. या देशाचं, या देशाच्या प्रजेचं. प्रजेला जे हवं आहे ते त्यांच्या राजांना, नेत्यांना समजतच नाही. नागपूर आणि जबलपूर इथे धुमसणारी आग विझवण्यात आली. जबलपूरला गोंड राजा शंकरसिंग आणि त्याचा पुत्र देशाच्या स्वातंत्र्याच्या विचारानं उद्युक्त होऊन क्रांतीचे विचार पसरवत असताना इंग्रजांच्या हाती पडले त्यांच्या कृत्यासाठी त्यांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं. आणि हे सर्व  करणाऱ्या इग्रजांना मदत करणारे कोण? तर दक्षिणेकडील आपल्याच देशाचे, इंग्रजांना फितुर झालेले मद्रासी शिपाई. दक्षिणेत कोल्हापूर, बेळगाव, सावंतवाडी, सातार्‍याचे रंगो बापूजी इंग्रजांना धावायला लावत आहेत.’’ रावसाहेबांचं नैराश्य अधिकच स्पष्टपणे जाणवत होतं. त्यांनी तात्यांना विचारलं, ‘ पण तात्या, रंगो बापूंना इंग्रजांनी फाशी दिलं. तात्या, तो रॉबर्ट, होम्स, पार्क, चिल, होप, लॉकहार्ट आणि कितीतरी इंग्रजांनी दक्षिण सीमा अडवली आहे.  तुम्ही उत्तरेकडे हल्ले केले. पण, तात्या, असं कुठवर चालणार? ’’

   तात्या म्हणाले, ‘ स्वामी निराश होऊ नका. रावसाहेब एक ना एक दिवस आपलं स्वप्न पूर्ण होईल. यातूनच काहीतरी निष्पन्न होईल. विजयश्री माळ घेऊन तुम्हाला शोधत येईल.’’ रावसाहेबांनी खिन्नपणे स्मित केलं.

   याचवेळी नरवरचा राजा मानसिंग तात्यांना शोधत आला  म्हणाला, ‘ तात्या! मेरे भय्या ! यहां हो आप, जंगल मे. मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं. शेवटी कळलं की, राणा प्रतापसिंगाप्रमाणे तुम्हीही जंगलात येऊन राह्यला आहात. ’’

 तात्यांनी विचारलं, ‘   मानसिंग,बातमी काय आहे?

मानसिंग हताशपणे बोलला, ‘भय्या,  नरवरचं राज्य हातून गेलं. आता मी तुमच्याबरोबर इथेच राहणार.’

 मानसिंगला धीर देत तात्या म्हणाले, ‘ घाबरू नका. नरवर गेलं तर जाऊ द्या. आपण ग्वालेरवर हमला करू.

मानसिंग घाबरून उद्गारला,’नाही भय्या, त्यांचं सैन्य खूप मोठं आहे. शिवाय इंग्रज त्यांच्या पाठीशी आहेत आणि आपण? ’’  बोलता बोलता मानसिंग थांबला.

तात्या त्याला समजावणीच्या स्वरात म्हणाले, हे बघा मानसिंग तुम्ही, मी,  रावसाहेब आणि नबाब, यापुढे तीन मुद्यांवर आपल्या  कार्यक्रमाची उभारणी करायची. एक, आपण प्रत्येकानं स्वतंत्रपणे लढायचं. दोन, यापुढे उघड लढाई न करता गनिमी काव्यानं लढायचं.

  ‘ पण तात्या लढण्याकरता रसद आणि शस्त्रं लागतील त्याचं काय? ’’   रावसाहेबांचा  गंभीर प्रश्‍न.

    ‘वाटेत  जी जी संस्थानं लागतील त्यांच्या संस्थानिकांकडे  शस्त्रांची आणि पैशाची खंडणी मागायची. यामुळे आपल्यावर शस्त्र किंवा रसद बाळगण्याची जबाबदारी राहणार नाही.’’ तात्या उत्तरले.

  ‘  ते देतील?  ’’  राजा मानसिंगनं आपली शंका व्यक्त केली.

   तात्या ताडकन म्हणाले, ‘ज्या भूमीसाठी त्यांना राज्य मिळालं, तिचं शत्रूपासून संरक्षण करणं त्यांचं कर्तव्यच नाही का?  मग ठरलं तर. मनातले सगळे पण परंतु पुसून टाका.’’

      तात्यांचं तडफदार उत्तर ऐकून रावसाहेब स्तंभितच झाले

Comments

Popular posts from this blog

प्रकरण १ ले येवले मुक्कामी तात्या टोपे यांच्या जीवनकार्यावर आख्यान

प्रकरण ७ वे इस्पितळातील इंग्रजांना मारू नका’, नानासाहेबांचा हुकुम; उठावाला जोर.

प्रकरण ५ वे पेशव्यांची जनजागृती मोहीम; ३१ मे अगोदरच भडका