प्रकरण १२ वे राणीचा गैरसमज, सैनिक तात्यांच्या बाजूचे

                   प्रजातंत्राचा प्रणेता        प्रकरण १२ वे           राणीचा गैरसमज, सैनिक तात्यांच्या बाजूचे

   तिकडे बुंदेलखंडाचा बंदोबस्त करून इंग्रजांनी झाशी शहराच्या पश्‍चिमेला पलटणी आणून तळ दिला. राणीला पत्र पाठवलं, पण तिने ठणकावून सांगितलं, ‘मै मेरी झासी नही दूंगी.’’ इंग्रज चिडले. राणीनंही युध्दाची तयारी सुरू केली. वैशाखाचा महिना आला. सूर्य तळपत होता. ऊन मी म्हणत होतं. झाशीच्या दक्षिणेकडे, उत्तरेकडे, पूर्वेकडे, पश्‍चिमेकडे इंग्रजांनी आपल्या सैन्यासाठी तंबू टाकले. झाशी भोवती वेढा घातला. आठ दिवस तुंबळ युध्द सुरू होतं. राणीनं पेशव्यांकडे मदत मागितली. पेशव्यांनी तात्यांना आज्ञा दिली. त्याप्रमाणे तात्या टोपे आपल्या सैन्यासह मदतीला धावून आले. पण पुन्हा देशवासीयांचे दुर्दैव आड आलं. बोलता बोलता आळेकर बुवा  ईश्‍वराचा धावा करू लागले.

          विठ्ठल विठ्ठल विठ्ठल / विठ्ठल विठ्ठल विठ्ठल / विठ्ठल विठ्ठल विठ्ठल / पंढरीनाथ महाराज की जय /श्री ज्ञानदेव तुकाराम/पंढरीनाथ महाराज की जय/

 श्रोतेहो, झाशीची बातमी कानावर येताच पेशवे अस्वस्थ झाले.  

नानासाहेब चिंताग्रस्त होते. सभागृहात अस्वस्थपणे येरझारा घालत होते. ते आपल्याशीच म्हणाले,

 ‘  मनूने आम्हाला मदत मागितली, आमचे शिपाई हिंमतीनं लढायला गेले.- - पण यश आलं नाही. सर ह्यूरोज जिंकला. इंग्रज जिंकले. आम्ही हरलो. परमेश्‍वरा! हे असं का झालं? विचार करता करता नानासाहेब पेशव्यांच्या येरझरा अधिकच वाढल्या. इतक्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई आत आली. संतापानं तिचा चेहरा  लाललाल झाला होता. तिला पाहून नानासाहेब उद्गारले, ‘ तुम्ही? मनू? झाशीची राणी? इथे? अचानक?‘

    राणी चिडलेल्या स्वरात म्हणाली, ‘ चला ओळख आहे म्हणायची. श्रीमंत नानासाहेब पेशवे माझी ही तलवार आपल्या चरणी ठेवते आहे. स्वत:ला आमचे अन्न्दाता म्हणवता आणि ऐनवेळी पाठ फिरवता? शोभलं का हे?आपली मैत्री विसरलात? ’’

नानासाहेब समजुतीच्या स्वरात बोलले,‘ हे काय बोलतेस मनू? आम्ही पाठ फिरवली? अग, आपली बालपणापासूनची मैत्री आम्ही कशी विसरू? ’’

 नानासाहेबांना थांबवत मनू म्हणाली, ‘ पुरे ,पुरे.आम्ही तुमच्याकडे सैन्याची मदत मागितली, आणि तुम्ही पाठवले बाजार बुणगे? आपला तोफखाना शत्रूच्या हवाली करून पळणारे पळपुटे शिपाई? ’’

 नानासाहेब उत्तरले, ‘ रागावू नका राणीसाहेब आमचं पूर्ण सैन्य आपल्या मदतीसाठी पाठवलं होतं. ’’

मनूचा संताप अजून कमी झालेला नव्हता. हॅ, ते काय सैनिक होते? मेणाचे पुतळे नुसते. ’’

  राणीच्या पाठोपाठ तात्या प्रवेशले होते. नानासाहेबांनी तात्यांकडे पाहत म्हटलं. ‘’तात्या, तुम्हीच समजवा हिला. इतकी मोठी झाली, राणी झाली तरी बालपण गेलं नाही अजून. ’’

  मनू उसळून म्हणाली, ‘ नाना, मला बोल लावू नका. तुम्ही आपलं तात्याचं कौतुक करत बसा. अहो! ह्यूरोजला पाहून तुमचे सैनिक पळून गेले. रणांगणावर लढणारे शिपाई  नव्हते ते रणछोडदास होते.  ’’

    इतका वेळ शांतपणे उभे असलेले तात्या म्हणाले, ‘ स्वामी, महाराणी माझ्यावर नाराज आहेत.  ’’

  मनूनं आपला मोहरा तात्यांकडे वळवत म्हटलं, ‘ खरं तर आम्ही तुमच्यावरच रागवलो आहोत. काय हो  तात्या, स्वत:ला मोठे रणधुरंधर म्हणवता आणि ऐनवेळी पळून जाता? पळपुटे कुठले. ’’

तात्या शांत स्वरात समजावू लागले, ‘ राणीसाहेब, आपल्याला राग येणं स्वाभाविक आहे. शेवटी राग आपल्या माणसांवरच काढता येतो ना? ’’

 मनू अधिकच चिडली. तिचा स्वर टिपेला गेला.‘ वारेवा, नाना, तात्याला हे असं बोलणं शोभतं का? तुम्हाला पटतं हे? कमाल आहे. ’’

  तात्या मात्र शांत होते. समजुतीच्या स्वरात ते बोलत होते, ‘राणीसाहेब, तुम्ही मदत मागितली, आम्ही आमचं सैन्य घेऊन तातडीनं झाशीकडे निघालो. झाशीच्या किल्ल्याला इंग्रज  सैन्यानं वेढा घातला होता. आमचं सैन्य इंग्रजांच्या पलटणींना मागून रेटीत होतं. मी आपल्याला एक प्रश्‍न विचारतो. राणीसाहेब, तेव्हा तुमचा तोफखाना कोण संभाळत होतं?  ’’

मनू उत्तरली, ‘ लालताबादी.  ’’

तात्यांनी विचारलं. ‘ राणीसाहेब, त्यावेळी इंग्रजांच्या पलटणीवर तोफा डागण्याच्या आपल्या आज्ञेचं पालन झालं? मी सांगतो, नाही. तुमच्या तोफा मुक्या झाल्या होत्या.

मनू विचारात पडली. ‘ पण तो म्हणाला, पेशव्यांच्या सैन्यावर तोफ कशी डागणार?  ’’

तात्यांनी नानासाहेबांकडे पहात म्हटलं, ‘ हां. तेच. तोफा इंग्रजांच्या सैन्यावर डागायच्या होत्या आणि नाव सांगितलं गेलं, पेशवे सरकारांचं.’’

मनूनं कपाळावर हात मारला. ती बुचकळ्यात पडली. ‘ अरे देवा ! हे असं कसं झालं? तोफा डागल्या गेल्या असत्या तर  इंग्रजांची फौज मागे हटली असती.’’

    ‘ हूं- आणि मागे आमचं सैन्य त्यांच्याशी लढायला सज्ज होतं. तोंडावर तुमचा मारा आणि मागून आमचा मारा अशी योजना होती. पण तसं झालं नाही. पण तोफा बंदच होत्या. त्यांच्या पलटणीतले सैनिक मागे वळून आमच्यावर आक्रमण करू लागले. आमची फौज इंग्रजांच्या हाती आयतीच सापडली होती. अशावेळी आमच्या फौजेनं काय करावं अशी आपली अपेक्षा होती?’’, तात्यांनी विचारलं. काय उत्तर द्यावं ते मनूला  सुचतच नव्हतं. मनू स्तब्ध झाली होती. सभागृहात सर्वच स्तब्ध होते. एक प्रकारची विचित्र शांतता पसरली.

त्या सगळ्याला छेद देण्यासाठी नानासाहेबांनी मनूला प्रश्‍न केला. ‘मनू, आता लालताबादी कुठे आहे?’’

मनू उत्तरली, ‘ काय माहीत. गेल्या काही दिवसात तो दिसलाच नाही. ’’

तात्या हसून बोलले, ‘बरोबर आहे. तो इंग्रजांकडे इनाम मागायला गेला असेल. ’’

नाना म्हणाले,  ‘ ह्यूरोज त्याला धन्यवाद देत असेल. ’’

मनूचा स्वर रडवेला झाला, ‘ नाना, मला क्षमा करा. तात्या, मी तुम्हाला दोष देत होते. तुमच्यावर किती चिडले मी. तुमच्या शूर शिपायांना बाजारबुणगे ठरवलं..आणि तुम्हाला- -तुम्हाला- रणछोडदास- -’’ राणीच्या डोळ्यातून अश्रू  वाहत होते.

  ‘ हे काय राणीसाहेब? झाशीच्या राणीचे डोळे पाण्यानं डबडबलेले? तुमच्या डोळ्यात अश्रू? ’’ तात्या सहानुभूतीनं म्हणाले.

 त्यावर नानासाहेब म्हणाले, ‘ नुसते अश्रू नाही, अश्रूंचा पूर वाहतो आहे. तात्या पाय पक्के रोवून उभे रहा.                            

स्वामी, खरं सांगू? आपल्या लढ्यात खरा धोका आहे तो फितुरांचा. ही फितुरीच माघार तर घ्यायला लावणार नाही ना? अशी भीति वाटते. आपण त्यापासून सावध असायला हवं. ’’

 ‘ तात्या, खरंच चुकले मी.’’  झाशीच्या राणीचे डोळे पुन्हा  भरून आले.

तात्या स्मित करीत म्हणाले, ‘असे अश्रू तुमच्या डोळ्यात शोभत नाहीत. तुमच्या डोळ्यात तुमच्या तलवारीसारखं तेजच झळकलं पाहिजे, राणीसाहेब.’’  तात्या बोलले.

  ‘मला मनूच म्हणा तात्या.’’  मनूच्या स्वरात क्षमायाचना जाणवत होती.

तात्या हसले, म्हणाले, ‘ ऊंहूं. तुम्ही राणीच आहात. तुमची तेजस्विता, तुमचा पराक्रम पाहून सगळी दुनिया तोंडात बोटं घालते. नानासाहेबांनी मनूची तलवार पुन्हा तिच्या हातात दिली. तात्यांनी म्यानातली तलवार काढून उभी धरत म्हटलं. ‘ पहा, हा सैनिक हातात तलवार घेऊन सदैव आपल्या सेवेसाठी तयार आहे. आपण आमच्या नेता आहात. ’’

मनू रूसून म्हणाली, ‘  तात्या, माफ नाही करणार का? हां, पहिले पेशव्यांची माफी मागते. ’’

 मनूचा राग शांत झालेला पाहून नानासाहेबांनाही बरं वाटलं. त्यांनी तात्यांना विचारलं. ‘तात्या, राणीसाहेबांचा काही पाहुणचार करायचा की नाही?

तात्या हसत उत्तरले,  ‘करणार तर! त्याशिवाय राग शांत कसा होणार? नाही का?’’

‘ का? आत्तापर्यंत माझा पाहुणचारच चालला होता.’’ मनू हसत म्हणाली. त्यावर नानासहेब आणि तात्याही हसले. पेशव्यांच्या महालातील त्या दालनातील वातवरण एकदम निवळलं. प्रसन्न झालं.

‘ चला जायला हवं’’,  मनू एकदम म्हणाली,

 ‘इतक्या रात्रीच्या जाणार? उद्या जा. ’’  नानासाहेब मनूला थांबवत म्हणाले.

 ‘ हूंऽ, तसंही माहेरवाशीणीनं बुधवारी जाऊ नये. म्हणतात ना, जाशील बुधी तर येशील कधी? ’’ तात्यांनी नानासाहेबांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

‘ पुरे. उद्या जाईन. पण, सक्काळी.’’ मनूनं हसत होकार दिला. दुसर्‍या दिवशी दिवस उजाडताच झाशीच्या राणीचे घोडे सज्ज करून त्यांचे सेवक उभे होते. राणी स्वार झाल्या, तेवढ्यात तात्यांचा घोडा तिथे येऊन उभा झाला.

  राणीनं हसून विचारलं, ‘ तात्या माहेरवाशीणीला सोडायलाही यावं लागतं का? अहो! मी एका राज्याची राणीही आहे, लक्षात आहे ना? झाशीचं राज्य संभाळते मी, मला संभाळायला कोणी नको.’’

  तात्या फक्त हसले. घोड्यावर बसल्या बसल्या मुजरा करून म्हणाले, ‘ जी राणीसरकार!  वेशीपर्यंत येऊन मी चरखारीला जाणार.’’

‘ चरखारीला? का? ’’  मनूनं आश्‍चर्यानं प्रश्‍न केला.

  ‘ पिताश्रींना भेटायला. बरंच वय झालं आहे ना त्यांचं. बोलता बोलता दोघांचे घोडे चालू लागले. मागून सेवक आणि दासींचे घोडे जात होते. महालाच्या  गवाक्षातून  नानासाहेब त्या आपल्या बालमित्रांकडे पहात होते. जवळच उभे असलेले रावसाहेब त्यांच्या प्रसन्न चेहर्‍याकडे पहात होते. घोड्याच्या टापांचा आवाज दूरदूर जात होत्या.

                  +++++        

           विठ्ठल,विठ्ठल,विठ्ल/ विठ्ठल,विठ्ठल,विठ्ल/ विठ्ठल,विठ्ठल,विठ्ल/

देवळाच्या गाभार्‍यात नामस्मरणाचा आवाज घुमत होता.

      आळेकर बुवा  सांगू लागले, तात्या राणीसोबत काही अंतरा पर्यंत गेले, नंतर ते चरखारीकडे वळले. आपल्या पिताश्रींना भेटायला. पण ते केवळ निमीत्त होतं. काल्पीचा किल्ला त्यांच्या हातून इंग्रजांकडे गेला तेव्हा दुसरा एखादा किल्ला हस्तगत करणं आवश्यक आहे असं तात्यांच्या मनात होतं. चरखारीहून तात्या ग्वालेरकडे वळले. तिथे गुप्त रूपानं वावरून त्यांनी सरदार, पुढारी, सैन्याचे नेते यांच्या भेटी घेतल्या. तात्या ठिकठिकाणी जाऊन सैनिकांना पटवून देऊ पहात होते, खड्या स्वरात तात्या सैनिकांना उद्देशून भाषण देत होते. ’सैनिकांनो, तुम्ही शूर आहात, बहाद्दूर आहात. या हिंदुस्थानात स्वराज्याची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. ते म्हणायचे, शक्तिपेक्षा युक्ती श्रेष्ठ. तेव्हा शत्रूशी प्रसंगी युक्तीनं लढा. पण हो! एकदा विजय मिळाला तर आनंदाने बेहोष होऊन हातीचं कार्य सोडू नका. कारण तुमच्या विजयानं शत्रू  सावध होतो. आणि त्या बेसावधपणाचा फायदा घेऊन शत्रू तुमच्यावर हमला करू शकतो. तुम्हाला हरवू शकतो. मित्रांनो, स्वराज्य मिळवण्याचं शिवाजी महाराजांचं बहुमूल्य स्वप्न आपण पूर्ण करायला हवं. आपल्या मागल्या पिढीतल्या काही शूरवीरांनी हे व्रत घेऊन, बराच पराक्रम केला. आपणही देशाच्या स्वातंत्र्याचं व्रत घेऊ या. आपल्या हातून हे व्रत पूर्ण होऊ शकलं नाही तर पुढच्या पिढीच्या हातात सोपवू या. आपण महादजी शिंद्यांचा पराक्रम, देशभक्ति आणि बायजाबाई शिंदे यांची देशाच्या स्वातंत्र्याविषयीची तळमळ विसरायची का? की, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा? ’

   तात्यांचे शब्द ऐकून समोरच्या सैनिकात कुजबूज सुरू होत होती. तात्यांनी ललकार पुकारला, ‘ बोला हर, हर, महादेव/ हर, हर, महादेव /’’ समोरचे सैनिक सम्मिलीत स्वरात प्रतिसाद देत होते. हर, हर, महादेव/ हर, हर, महादेव/ हर, हर, महादेव/

       तात्यांच्या भाषणाचं वर्तमान नरवरचा राजा मानसिंग याच्या कानी गेलं. राजा मानसिंग स्वत:हून तात्यांना भेटायला गेला. ‘ तात्या, दोस्त, आपलं हे स्वप्न पूर्ण करण्याचं व्रत मी मानसिंग घेतो. मी नरवरचा राजा, मानसिंग. आजपासून जे तुमच्या मनात तेच माझ्या मनात असेल. तात्या, तुम्ही इशारा करा मी तिथे जाऊन लढेन.

   तात्यांनी राजा मानसिंगला आलिंगन दिलं. वा: दोस्त. तात्यांना आनंद झाला .त्यांना नवीन कुमक मिळाली. त्यांचा उत्साह दुणावला.

    तात्यांनी ग्वालेर राज्याची खडान्खडा माहिती घेऊन तात्या गोपाळपूरला रावसाहेबांसमोर हजर  झाले. याबाबत सर्व वृत्तांत सांगण्यासाठी ते दोघे झाशीकडे वळले. राणी लक्ष्मीबाईला ती वार्ता कळताच ती उत्तेजितपणे म्हणाली, ‘ आपण  ग्वालेरकडे कूच करायचं. तात्या, आपण आता मागे हटायचं नाही. मग मृत्यू आला तरी बेहत्तर. ’’

तात्या उत्तरले,  ‘  जशी आपली आज्ञा. राणीसरकार, आपले म्हणणे बरोबर आहे.   ’’

 त्यांचं सैन्य अमेन महालात येऊन थडकलं. तिथून त्यांनी शिंदे सरकारना पत्र पाठवलं. ’ आम्ही तुमच्याकडे स्नेहभावानं येत आहोत. आपला पूर्वीचा संबंध लक्षात घेऊन आपण आम्हाला साहय करावं, म्हणजे दक्षिणेकडे जाता येईल.’

   पण शिंदे सरकारनं उत्तर दिलं. ‘ त्या पूर्वीच्या गोष्टी झाल्या. तुम्हाला आमच्याशी युध्द करण्याची इच्छा आहे का? ’’ नंतर शिंदे सरकार बालेघाटी पलटण घेऊन पेशव्यांवर चालून आले.

    ‘ अरेरे! तात्या महादजी शिंदेचं तेज या जयाजी शिंद्यात तिळभरही उतरलं नाही का?’’ एक श्रोता निराश स्वरात बोलला.

       बुवा पुढे सांगू लागले. झाशीच्या राणीची तलवार  म्यानाबाहेर आली. दोन्ही सैन्यं समोरासमोर येऊन ठाकली. परंतु तात्यांना पाहताच शिद्यांच्या सैन्यानं आपल्या तलवारी पुन्हा म्यान केल्या. तोफा उडल्याच नाहीत.

     आळेकर बुवांनी कीर्तन सुरू केलं.

राम राम सीताराम सीताराम/पुंडलिक वरदा हरि विठ्ठल/श्री ज्ञानदेव तुकाराम /

     तर काय सांगावे, ग्वालेरचे राजे जयाजीराव शिंदे इंग्रजांना जवळ करू पहात होते. पण त्यांच्या शिपायांना ते पटत नव्हतं. शिंदे सरकारांच्या पदरच्या सरदारांनी त्यांच्या राजांना स्पष्ट सांगितलं की, पेशवेसरकार विरूध्द आम्ही लढणार नाही. ते आपले यजमान आहेत. त्यांच्यावर आम्ही तोफा डागणार नाही.

      मात्र याचवेळी पेशवे सरकारच्या सैन्याकडून तोफा डागण्यात आल्या. वीर मोठमोठ्याने आरोळ्या देऊ लागले. राजे चिडले. दिवाण दिनकरराव घोड्यावरून उतरले. त्यांनी स्वत: तोफेला बत्ती दिली. शिंदे सरकारांना ही बत्ती देण्यास सुचवलं. पण हायरे दैवा! शिंदे सरकारांच्या गोलंदाजांनी तोफांमध्ये बाजरीच्या थैल्या घातल्या होत्या. ते ट्टष्य पाहताच श्रीमंत जयाजीराव शिंदे आणि त्यांचे दिवाण दिनकरराव राजवाडे घाबरले, घोड्यांवर स्वार होऊन ते आग्र्याकडे निघून गेले.

   ’ तात्या आणि झाशीच्या राणीच्या शिपायांनी लढाई जिंकली’ असा निरोप आल्यावर रावसाहेब पेशव्यांना थाटाने तेथे आणण्यात आलं. ग्वालेरच्या सैनिकांनी त्यांना  तोफांची सलामी दिली. तिथल्या द्रव्यभांडाराचा अधिकारी अमरचंद भाटिया यांनी ते अपार भांडार श्रीमंतांना अर्पण केलं. पेशव्यांनी शिंदे सरकारांची बाकी दौलत हस्तगत केली. हत्ती, घोडे, उंट, बैल, तोफा वगैरे ताब्यात घेतल्या. तात्यांनी मृत झालेली माती हातात घेतली आणि त्या चिमूटभर मातीवर फुंकर मारताच तिथे एक राजसिंहासन प्रकट झालं. महादजी शिंद्यांच्या ग्वालेर राज्यात एक महदाश्‍चर्य घडलं. श्रीमंत रावसाहेब पेशव्यांना देण्यात आलेल्या तोफांच्या सलामीनं राज्याभिषेकाचं वर्तमान पंचक्रोशीतल्या जनतेला आणि रानोमाळ इतस्तत: विखुरलेल्या देशी सैनिकांना कळलं. या नवीन सत्ताकेंद्राच्या स्फूर्तीनं विस्कळीत झालेल्या त्या  सैनिकांमध्ये चैतन्य निर्माण होईल. त्यांना शिस्त लागेल, हा तात्यांचा अंदाज खरा ठरला. देशात नवचैतन्याचं वारं वाहू लागलं. तात्या टोपेंच्या या अव्दितीय  पराक्रमानं सगळ्या जगाला दिपवलं.

        झाशीच्या राणीनं फर्मान काढलं, रणसमारंभाशिवाय सर्व समारंभ बंद करावेत. ऐषआरामात, अव्यवस्थेत, हलगर्जीपणात सैनिकांनी गुंतू नये. या एका यशाने देशात स्थिरता येणार नाही, हे ध्यानी घ्यावं. सज्ज रहा. अजून पुष्कळ मजल गाठायची आहे.

   ++    

Comments

Popular posts from this blog

प्रकरण १ ले येवले मुक्कामी तात्या टोपे यांच्या जीवनकार्यावर आख्यान

प्रकरण ७ वे इस्पितळातील इंग्रजांना मारू नका’, नानासाहेबांचा हुकुम; उठावाला जोर.

प्रकरण ५ वे पेशव्यांची जनजागृती मोहीम; ३१ मे अगोदरच भडका