प्रकरण १५ वे तात्या टोपे यांची जनजीगृती मोहीम
प्रजातंत्राचा प्रणेता प्रकरण १५ वे तात्या टोपे यांची जनजीगृती मोहीम
तात्या त्या जंगलात एकटेच उरले? नाही. तात्या म्हणतात, ‘ मी एकटा कसा? हे माझे दोन इमानदार घोडे माझ्याबरोबर आहेत ना! शिवाय माझ्या मनाची हिंमत अजून माझ्याबरोबर आहे आणि शरीरावरच्या या जखमा माझ्याबरोबर आहेत. त्या मला कधीच सोडून जाणार नाहीत. इतक्यात तात्यांना शोधत नरवरचे राजे मानसिंग आले.
त्यांनी विचारलं, ‘ तात्या!- - भय्या कैसे हो? ’’
तात्या उत्तरले, ‘ बिल्कुल ठीक. मानसिंग, नरवरचं राज्य जिंकलंत ना?- बोला? हो म्हणा. ’’
मानसिंग यांनी मान खाली घालून नकारार्थी हलवली. ‘तात्या शिंदे सरकारांची फौज अफाट आहे.’
तात्या म्हणाले, ‘असेल, पण तरीही तुम्ही लढत रहा. एक ना एक दिवस विजय नक्की मिळेल.’
मानसिंग खिन्नपणे म्हणाले, ‘भय्या, सैन्यासाठी रसदही हवी न?’
तात्यांनी उपाय सुचवला, ‘ राजे, या देशातल्या प्रजेला आवाहन करा, सगळं मिळेल. मानसिंग, धनवान राजसत्तेपुढे मान झुकवाल की, प्रजेचा विचार कराल? त्या धनवानांना प्रजेच्या सुखदु:खाशी काहीही सोयर सुतक नसतं. ते फक्त स्वत:च्या सुखाचाच विचार करतात. केवढं दुर्दैव पहा. या धनवान राजसत्तेच्या मनाला देशाच्या स्वातंत्र्याचा विचार शिवतसुद्धा नाही. बिचारी प्रजा. पण त्यांच्या मनाचा, मतांचा विचार व्हायला हवा. त्यांना काय हवं आहे, स्वातंत्र्य की पारतंत्र्य? जनतेच्या सुखाचा विचार कोणी करायचा? नाही मानसिंग या प्रजेसाठी आपल्याला काहीतरी करायलाच हवं.’’ बोलता बोलता तात्यांनी डोळे बंद केले. काही विचार करून, उत्साहित होऊन उठले आणि उत्तेजित स्वरात म्हणाले, ‘मानसिंग, उद्यापासून आपण एक मोहीम हाती घेऊ.’
मानसिंगाच्या भुवया आश्चर्यानं वर गेल्या.‘नवी मोहीम? उद्यापासून? तात्या, तुम्ही बिमार आहात. शिवाय - - ’
‘ अहो! तुम्ही बघा. नवी मोहीम हाती घेताच हे आजारपण पळून जाईल.’’
मानसिंग आश्चर्यानं म्हणाले, ‘भय्या, कमाल आहे तुमची. आपण अशा अवस्थेत. जवळ सैन्य नाही.- ’
तात्यांनी मानसिंगला पुढे बोलूच दिलं नाही. ‘आता विचार करत नका बसू. चला तयारीला लागू. मानसिंग आपण फलक तयार करू. गावागावात जाऊन ते लावू. गावातल्या प्रजेच्या मनाचा ठाव घेऊ. त्यांना प्रेरित करू. फलकांवर लिहायचं- - गाववासियांनो, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येक गाव स्वतंत्र रहायला हवं. आपण या गावचे राजे आहात. इंग्रजांपासून आपल्या गावाचं, आपल्या संस्कृतीचं रक्षण करा. चला मानसिंग घाई करा. चला.’’ तात्या उत्साहानं उठले आणि चालायला लागले.
-आळेकर बुवा कीर्तन पुढे नेत म्हणाले, खरंच सांगतो महाराजा, तात्या टोपेंचं धैर्य, शौर्य म्या पामराने काय वर्णावं. तात्याचे घोडे पळत होते. सातपुड्यातील घनदाट जंगल पार करून ते मुलताईला आले, तिथून खांडवा, खरगोण, जुलवानिया, इंग्रज पाठीवर होतेच. त्यांना चुकवून ते गुजराथेत गेले. पिपळा, भरीया, पिलोद, लिमडी, झलोद, बन्सवारा अशी किती नावे सांगू? प्रत्येक दिवशी एक गाव गाठून फलक लावायचे, की चालले पुढे. जिकडे तिकडे एकच आवाज,
‘गाववासीयांनो, आपण या गावाचे राजे आहात, आपल्या गावाचे रक्षण करा. स्वातंत्र्य अबाधित राखा.’
देवळतल्या गाभार्यात निरनिराळ्या आवाजात हीच वाक्ये ऐकू येऊ लागली.
त्यानंतर सम्मिलीत स्वरात घोषणा दिल्या -
भारत माता की जय!
तात्या टोपे की जय!
भारतमाता की जय!
भारतमाता की जय!
तात्या टोपे की जय!
मानसिंग म्हणाले, ‘वाह!, तात्या, आपल्या शूरपणाची, कणखर मनाची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. आज गावोगावीची प्रजा देशाच्या स्वातंत्र्याची भाषा करते आहे. प्रजेचं राज्य. जनतेचं राज्य. वा:, बहुमूल्य कल्पना. देशाच्या स्वातंत्र्यासाठी फौजफाटा नको. धन नको. वाह!. तात्या, तुम्ही महान आहात. तुमच्या बहादुरीला, चातुर्याला दाद द्यायला हवी. तात्या! कुठे आहात? तात्या! ऐकता आहात ना? तात्या! तात्या, तुम्हाला किती बुखार आहे. या अशाच हालतमध्ये तुम्ही गावोगाव फिरलात? आता आराम करा. बुखार उतरू द्या.’’
‘ मला ताप आहे? मला तर जाणवलंच नाही. ’’
मानसिंगांनी सुचवलं, ‘तात्या, खरं सांगू? आता आराम करा. देशाच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहणं थांबवा.
तात्यांनी आश्चर्यानं विचारलं, ‘काय? देशाच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहणं थांबवू? काय बोलता हे? या देशातले राजे तुम्ही आणि असं बोलता? आम्ही तुमच्यासाठी शिर तळहातावर घेऊन लढतो आणि तुम्ही हा असा विचार सुचवता?’
मानसिंग म्हणाले, ‘तात्या, तुम्ही महान आहात. अजी, इंग्रजही तुमच्या महानतेची, शौर्याची, धैर्याची तारीफ करतात. तात्या, ते दयाळू आहेत. ’’
‘ मानसिंग. तुम्हीही असं बोलायला लागलात? हे बघा. जीवातजीव असेपर्यंत मी देशासाठी लढेन. लढत राहीन.’
मानसिंग विश्वासानं सांगू लागले, ‘तात्या, इंग्रज तुम्हाला सन्मानानं वागवतील. तुमची मुलंबाळं राजवैभव भोगतील. ’’
तात्या खिन्नपणे हसले, ‘भोळे आहात मानसिंग. माणसांची पारख करायला शिका. आज जे गोड वाटतंय ते उद्या राहीलच का? स्वार्थाशिवाय कोणीही गोड बोलत नाही. अहो! उगीचच कोणी का दया दाखवेल? आपल्या देशाला ते लुटून नेतील.’ बोलता बोलता तात्यांचा आवाज क्षीण होत गेला. डोळे बंद होत गेले. ते कण्हू लागले.
मानसिंगानी पाहिलं तात्यांची शुध्द हरपत होती. ते स्वत:शीच म्हणाले, ‘ तात्या आप के लिए दवा ले आता हूं.’ ते गेले.
बुवांनी हलकेच हातातले टाळ वाजवले. तो सौम्य गजर कानावर येत असताना तात्यांना त्यांची पत्नी समोर उभी असल्याचा भास झाला.
Comments
Post a Comment