प्रकरण १६ वे या देशात मी प्रजातंत्राचं बीज रोवलं आहे.
प्रजातंत्राचा प्रणेता प्रकरण १६ व या देशात मी प्रजातंत्राचं बीज रोवलं आहे.
’ जानकीऽ,तू? मला माहीत होतं, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस. आपली मनू कुठे आहे?- - माझ्यावर रुसली आहे? मनू, तुला त्या मनूसारखं शूर व्हायचं आहे. देशासाठी लढायचं आहे. मग प्राण गेले तरी बेहत्तर.- - सखारामला म्हणावं आता दांडगाई सोड मोठा हो. जानकी, माझं देशाच्या स्वातंत्र्यासाठीचं, प्रजातंत्राचं स्वप्न तुम्ही गावोगावी जाऊन पोचवा. फलक तयार आहेत. हो म्हण जानकी, मनू, सखाराम, गावोगावी जाऊन सांगा, गावकर्यांनो! तुमच्या गावाचं रक्षण करा. - - तात्या बोलता बोलता बेशुद्ध झाले.
काही वेळानं मानसिंग आले. त्यांनी तात्यांची शस्त्र उचलून नेली. इंग्रजांचे शिपाई आले. त्यांनी तात्यांना उचलून नेलं. तात्यांना शुध्द आली. त्यांनी डोळे उघडले, पाहतात तर त्यांच्या भोवती इंग्रजांचे सैनिक उभे. कोपर्यात मानसिंग उभा. तात्यांनी विचारलं,‘माझी तलवार? माझी शस्त्रं कुठे आहेत? मानसिंग, ह्या सगळ्याचा अर्थ काय? ’’
मानसिंग उत्तरला, ‘ तात्या, मी जे केलं ते तुमच्या भल्यासाठीच केलं.’’
तात्यांना निराशेच्या गर्तेत जात आहोत असं वाटलं. खिन्न स्वरात तात्या बोलले, ‘ राजे, काय म्हणावं तुम्हाला? फारच भोळे आहात मानसिंग. कोणावरही पटकन विश्वास ठेवता. तात्यांनी एक दीर्घ निश्वास टाकला आणि स्वत:शीच म्हणाले, ’असो. तात्या, तुझं नशीबच खोटं, हे असे साथीदार मिळाले. ’’
मानसिंग तात्यांना समजावू पहात होते, म्हणाले, ‘भय्या, इंग्रज खूप दयाळू आहेत. माझं राज्यही परत करायला लावलं. इतकंच नाही तर, शिंदे सरकारांच्या कैदेत असलेल्या माझ्या परिवाराला त्यांनी रिहा करायला लावलं.’’
तात्यांच्या डोळ्यासमोर सगळं चित्र स्पष्टपणे उभं झालं. ते स्वत:शीच म्हणाले, ‘ हूंऽऽ. हे असं आहे. इंग्रजांनी दया का दाखवली? उगीच? मानसिंग, या जगात स्वार्थ कोणाला सुटला नाही, हेच खरं. तुमचा परिवार मुक्त झाला, तुमचं राज्य परत मिळालं, ते केवळ दयेपोटी? नाही मानसिंग, त्यांना हरवू पाहणार्या या तात्याला तुम्ही त्यांच्या ताब्यात दिलंत, त्या बदल्यात तुमच्यावर ही दया करण्यात आली. मानसिंग, माझ्या आजारपणाचा तुम्ही फायदा घेतला. भय्या, भय्या म्हणत माझा केसानं गळा कापलात. पण- - मानसिंग यामुळे माझं गावोगावी उठाव करण्याचं स्वप्न, प्रजातंत्राचं स्वप्न अपूर्ण राहिलं हो! मानसिंग, देशाच्या स्वातंत्र्याचं मोल या देशातल्या जनतेला कळलं, पण तुम्हाला कळलं नाही. किंवा कळूनही तुम्ही ते स्वत:ला उमगू दिलं नाही. कारण तुम्ही सत्ताधारी, आत्मकेंद्री. स्वत:च्या सुखापलीकडे तुम्हाला काहीच दिसलं नाही. परमेश्वरा, या सत्ताधार्यांना प्रजेच्या सुखाचा विचार करण्याची बुद्धी दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना.’’ बोलता बोलता तात्यांची पुन्हा शुध्द गेली.
येवल्याच्या त्या देवळातही भीषण शांतता पसरली. आळेकर बुवांचा स्वर खूपच खिन्न वाटत होता. शूरवीर तात्या विश्वासघाताच्या जाळ्यात अडकले. बुवांचे डोळे वहात होते. त्यांनी स्वर लावला. हार्मोनियमवरही तोच सूर वाजू लागला. बुवा गाऊ लागले-
परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला/
असुनी हाच मालक घरचा चोर म्हणती त्याला/
मातृभूमी ज्याची त्याला होत बंदीशाळा/
परशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला/
देवळातलं वातावरण गंभीर होतं. अनेक श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.
तात्यांना जनरल मीड या इंग्रजाच्या सिप्री इथल्या छावणीत कडक बंदोबस्तात ठेवण्यात आलं. दुसर्या दिवशी तात्यांवर कोर्टमार्शल भरण्यात येऊन तात्यांवर आरोप ठेवण्यात आले.
‘ तात्यांवर आरोप?’’
‘ देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणपणानं लढा दिला, त्या वीरावर आरोप?’’
‘ का? कशासाठी? ’’ श्रोते अस्वस्थ झाले. प्रश्नामागून प्रश्न विचारत होते.
बुवा सांगू लागले, तात्यांनी इंग्रजांविरूध्द युध्द पुकारलं होतं. लढाया, चकमकी झाल्या. तात्यांनी शत्रुला हैराण केलं होतं. त्यांची झोप उडवली होती. शत्रूनं तात्यांच्या सैन्याला चारही बाजूंनी घेरलं तरी ते अलगद निसटत होते. लढाई ऐन भरात आली असताना तात्यांनी आपल्या सैन्याला शस्त्र टाकून नदीत उड्या घ्यायला सांगितलं. यामुळे लढणारे शत्रूचे सैनिक आ वासून पहातच राहिले होते.
‘ पण यात तात्याचं चुकलं काय?’’ एका श्रोत्यानं जरा रूध्द स्वरातच विचारलं. गाभार्यात कुजबुज सुरू झाली.
बुवांनी दोन्ही हात उंच करून शांत राहण्याचं आवाहन केलं. बघा आजही आपल्याला तात्यांना पकडल्याचा राग येतो आहे. तर विचार करा तात्यांचं मन किती विदीर्ण झालं असेल. अहो! गर्जना करीत करीत शत्रूच्या चिंधड्या चिंधड्या करायला निघालेला, प्राणांवर उदार होऊन देशासाठी लढणारा तो शूरवीर सेनपती रात्रंदिवस सगळ्या देशात धडपडत, फिरत स्वातंत्र्यासाठी झटत होता. जाळ्यात पकडल्यावर त्याच्या मनाच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या असतील. श्रोत्यांमधील तरुण आवेशानं म्हणाला.
बुवांनी उपरणं डोळ्याला लावलं आणि डोळे टिपले आणि ते सांगू लागले,- जनरल मीड न्यायाधीशाच्या खुर्चीत बसला. त्याच्यासमोर तात्यांची चौकशी सुरू होणार होती. तात्यांना तिथे बेड्या घालून आणण्यात आलं. तात्यांच्या चौकशीच्या वेळी खूप इंग्रज लोक सभागृहात गर्दी करून होते. याशिवाय तात्यांना पहायला आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावातून लोक येत होते.
जनरल मीडनं तात्यांकडे पाहून विचारलं,‘ येस. टो टुमही तातिया टोपे हो ! बिलिव्ह नही होता. इंग्लिश पेपर्सने लिखा था, तातिंया टोपे याने एरियल. याने ज्याला बॉडी नाही असा. ’’
तात्यांनी स्मित करीत म्हटलं, ‘ तात्या, एरियल! ज्याला शरीर नाही असा? ’’
जनरल मीड पुढे म्हणाला, ‘ टोपे, टुमपर थ्री इलजाम हाएत.’’
तात्या ताडकन् उत्तरले, ‘ मला तुमच्याकडून माझ्यावरचे इल्जाम ऐकण्यात मुळीच स्वारस्य नाही.’’
‘ सवारस ! मीन्स? ’’ न समजून जज्जच्या भूमिकेतल्या मीडनं विचारलं.
तात्यांनी मानसिंग कडे कटाक्ष टाकून म्हटलं, ‘समजवा तुमच्या दयाळू मालकाला. ’’
‘ तात्यांना इल्जाम ऐकायचे नाहीत.’’ मानसिंगनं जनरल मीडला सांगितलं.
‘ आता फक्त शिक्षा ऐकवा. ’’ बस. तात्या शांत स्वरात बोलले.
जनरल मीड चिडून बोलला, ‘ नो नो. टुमको इल्जाम ऐकावेच लागेल. यू मस्ट लिसन. टुमी बचाव करू शकाल. ’’
तात्या पुन्हा हसत म्हणाले, ‘ बचाव? तुमच्या कडून? हूंऽ ऽ.अहो! इंग्रज जे काही करतात ते योजनापूर्वक करतात.’’ प्रेक्षागृहात खसखस पिकली.
जनरल मीड पुन्हा चिडला. ‘ऑर्डर! ऑर्डर!! क्या कहा? अंगरेज क्या?’’ काहीही उत्तर न देता तात्या शांतपणे उभे होते.
जनरल मीड पुढे बोलू लागला, ‘ ऐक. इल्जाम ऐक. पहिला इल्जाम, टाट्या टुमी राजद्रोह केला.’’
तात्या उसळून उत्तरले, ‘राजद्रोह? मी राजद्रोह केला? हे पहा, मी इंग्रजांना कधीही या देशाचा राजा मानलं नाही, सत्ताधीश मानलं नाही. त्यामुळे राजद्रोहाचा प्रश्नच येत नाही. माझे स्वामी पेशवा. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या आज्ञेनुसार मी काल्पीपर्यंत वागलो आणि त्यानंतर श्रीमंत रावसाहेब पेशव्यांच्या आज्ञेनुसार वागलो. मी परमेश्वराला स्मरून सांगतो, माझे स्वामी असलेल्या पेशव्यांशी मी कधीही द्रोह केला नाही.’’
तात्याचं बाणेदार उत्तर ऐकून सभागृहाबाहेर सम्मिलित स्वरात घोषणा सुरू झाल्या.
तात्या टोपे जिंदाबाद / तात्या टोपे जिंदाबाद/ तात्या टोपे जिंदाबाद/
बाहेरच्या आवाजाकडे दुर्लक्ष करून जज्जच्या खुर्चीत बसलेल्या जनरल मीडनं बोलायला सुरूवात केली,
‘सेकंड इल्जाम. टुमी वॉर केला. युध्द केलं. ’’
तात्या शांत स्वरात उत्तरले, ‘ हो. बरोबर आहे. इथले इंग्रज जर गुपचूप देश सोडून निघून गेले असते, तर युध्द झालंच नसतं. कारणाशिवाय युद्ध करणं बरोबर नाही. खरं तर प्रजेला निवांतपणे सुखात जगू द्यायला हवं. पण आम्ही युद्ध का केलं? आमच्या देशावर जर आक्रमण झालं नसतं, तर युद्ध केलंच नसतं. आणि युद्ध काय फक्त आम्हीच केलं? तुम्ही काय केलत? टाळी एका हातानं वाजत नाही. मी म्हणतो, ज्यांनी ज्यांनी युद्ध केलं, त्या सगळ्यांना शिक्षा द्या. ’’
बाहेर तात्यांच्या नावाचा पुन्हा जय घोष सुरू झाला.
तात्या टोपे जिंदाबाद / तात्या टोपे जिंदाबाद/ तात्या टोपे जिंदाबाद/
जनरल मीड त्रासून म्हणाला, ‘ टाट्या, लिसन, थर्ड इल्जाम. कानपूरमध्ये इग्रज लेडिज आणि चिल्ड्रनची टुमी हत्त्या केली. यू आर श्रूड’’
प्रेक्षकात बसलेली जेन एकदम उठून उभी झाली आणि म्हणाली,‘ सॉरी जनरल, हा इल्जाम तुमी तात्यावर लावू शकत नाही.तात्या श्रूड नाही. तात्या शूर आहे. ’’
तात्यांनी आश्चर्यानं प्रेक्षागृहाकडे वळून पाहिलं , ‘ जेन? तू? ’’
जज्जच्या खुर्चीत असलेल्या मीडचा स्वर चढला. त्यांनी तिला कडक शब्दात सांगितलं, ‘जेन, हे कोर्ट आहे.’’
जेन ठामपणे उत्तरली, ‘हो कबूल आहे आणि कोर्टानं योग्य तोच न्याय द्यावा असंच आम्हाला वाटतं.’’ प्रेक्षागृहातले बाकीचे प्रेक्षक ’ राईट,राईट ’ असं ओरडले. जेन पुढे बोलू लागली, ‘ मीडसाहेब, मी इंग्लिश लोकांचा पक्ष घेऊनच सांगते आहे. खुल्या दिलानं न्याय करा. दुष्टबुद्धीनं कोणावर अन्याय होऊ देऊ नका. ’’
प्रेक्षागृहातल्या प्रेक्षकांनी ’ राईट,राईट ’ असं म्हणत टाळ्या वाजवत जेनला पाठिंबा दर्शवला.
आता मात्र जनरल मीड चिडले, ‘ ऑर्डर! ऑर्डर! जेन आपली लिमिटमधी रहा. मर्यादा सोडू नको.’’ नंतर तात्यांकडे पाहून त्यानं खोचकपणे हसून विचारलं, ‘ टोपे, टुला एकदा टुझा देश पहायचा आहे? बघ. समदा देश इंग्रजांचं गुणगान करतो आहे. टोपे तुझा त्याग, देशप्रेम फोकट गेलं. देशासाठी टू लढला पण फ्युचरमधी टुला कोणी यादही करणार नाही. ’’
तात्या उत्तरले, ‘ हरकत नाही. मी जे केलं ते, माझी आठवण रहावी म्हणून नाही. मी लढलो ते या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. मी जे केलं ते या देशाच्या प्रजेच्या सुखासाठी. ’’
बाहेर जमलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
मीड म्हणाला कमाल आहे. ‘ अजून हा टोपे देशाच्या स्वातंत्र्याचाच नारा लावतो आहे. ए टोपे, टुला फाशीची शिक्षा सुनावतो आहे. ’’
जेन ताडकन् उठून उभी झाली आणि जोरात म्हणाली, ‘ फाशी? तात्याला फाशी? नाही, नाही. असं करू नका. तात्या शूर आहे. मीडसाहेब, इंग्रज शूरांचा सन्मान करतात, असं म्हणतात, मग तात्याला फाशीची शिक्षा का? मीडसाहेब, पुन्हा एकदा विचार करा.’’
जनरल मीड रागानं म्हणाले, ‘ डोंट टीच मी. ’’
‘बट, इंग्रज शूरांचा सन्मान करतात ना? जेन बोलू पहात होती पण तिला बोलू न देता, मीड शिपायांना उद्देशून ओरडले, ‘ ले जाओ इसे. ’’
शिपाई पुढे आले आणि जेनला पकडून घेऊन गेले.
जेन जाता जाता म्हणत होती. ‘ ओ गॉड, ब्लेस हीम. ब्लेस हीम, ब्लेस हीम.’’
प्रेक्षागृहातले बाकीचे लोक ‘ गॉड ब्लेस हीम ’’ असं म्हणत तिच्या मागोमाग बाहेर गेले.
‘ कोर्ट इज अॅडजोर्न्ड.’’ असं म्हणून जनरल मीड जज्जच्या खुर्चीतून उठले आणि निघून गेले. तात्या टोपेंच्या चौकशीचं नाटक संपलं होतं.
तात्या एकटेच उभे होते. बाजूला दोन शिपाई. काही क्षणांनंतर राजा मानसिंग आले. त्यांनी पुढे होऊन एकदम तात्यांचे पाय धरले. ‘ तात्या, मी चुकलो, गलती झाली. मला क्षमा करा भय्या. मला वाटलं इंग्रज खरंच दयाळू आहे, ते दया दाखवतील. निदान तुमच्या या जखमी अवस्थेत तरी त्यांनी- -’’ मानसिंगला हुंदका आवरेनासा झाला.
तात्या म्हणाले,‘ उठा मानसिंग. अहो! नरवरचे राजे तुम्ही. मी एक कैदी, माझे पाय धरणं शोभत नाही तुम्हाला. उठा. ’’
मानसिंगना अश्रू अनावर झाले. ‘ भय्या.मला माफ करा.’’ राजे मानसिंगच्या डोळ्यातले अश्रू तात्यांचे चरण क्षालन करू लागले.
तात्या मात्र निविकार होते, मानसिंगला उठवत म्हणाले, ‘ मानसिंग, इंग्रजांच्या बोलण्यात येऊन तुम्ही फितुर झाला नसतात, तर आज ही वेळ आली नसती. मी आणखी जगलो असतो तर अजून देशाची सेवा करू शकलो असतो. स्वातंत्र्यासाठी लढू शकलो असतो. गावोगावी जाऊन जनतेला जागृत केलं असतं. मानसिंग, निदान त्या जनतेचा तरी विचार करायचा? हूंऽ. आमच्या राज्यकर्त्यांना फितुरीचा हा शापच आहे आणि जोपर्यंत त्यांची ही मानसिकता जात नाही, तोपर्यंत हा देश पुढे जाऊ शकत नाही. मानसिंग, तुम्ही नरवरचे राजे आहात. आता तरी प्रजेसाठी जगा. हूंऽ. कठीण असतं ते, पण राजा फक्त स्वत:च्या सुखाचा, कुटुंबाच्या सुखाचा विचार करत राहिला तर प्रजेला कसा सुखी करणार? ज्या आपल्या देशात प्रभू रामचंद्र प्रजेच्या सुखासाठी झटले, त्याच या भूमीवर आज तुम्ही राजे आहात. राजे मानसिंग, प्रजेच्या सुखासाठी जगायला शिका. मी फक्त तुम्हालाच दोष देत नाही. या देशातले कितीतरी राजे स्वत:साठीच जगताहेत. तुम्हाला निदान पश्चात्ताप तरी होतो आहे. हेही नसे थोडके.’’
मानसिंग हुंदका देत बोलले,‘ पुरे तात्या. माझ्या कधी मनातही आलं नव्हतं की, इंग्रज तुमचं जीवनच संपवतील म्हणून. तुम्हाला फाशी म्हणजे- - ’’ मानसिंगच्या डोळ्यासमोर फाशीचा फास येत होता आणि मानसिंगला अधिकच रडू येत होतं.
तात्या निश्चल उभे होते. शांत स्वरात ते म्हणाले, ‘ उगाच शोक कशाला करता मानसिंग? माझ्या मरणाचं दु:ख करू नका. अहो, या जगात येणार्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस मरायचंच असतं. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा इथला नियमच आहे. हां, पण मला देवाच्या मर्जीनं मृत्यू आला असता तर मी हाती घेतलेलं कार्य पूर्ण होऊ शकलं असतं. मानसिंग, तुमच्या मर्जीनं हा देह सोडून मी जात आहे. पण एक लक्षात घ्या, आत्मा अमर आहे. या देशात मी प्रजातंत्राचं बीज रोवलं आहे. जोपर्यंत ते अंकुरत नाही, बहरत नाही, तोपर्यंत माझा आत्मा इथेच भटकत राहील. तात्या बोलत असतानाच इंग्रज शिपाई त्यांना कारागृहाकडे नेऊ लागले. मानसिंग खाली मान घालून डोळे पुसत जागीच उभे होते.
बाहेर गावकरी, शेतकरी उभे होते. हात जोडलेले होते. आपल्या सुखासाठी, स्वातंत्र्यासाठी लढणार्या त्या महापुरुषाचं दर्शन घेण्यासाठी. शेवटचं दर्शन. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वहात होता. त्यांना पाहून तात्यांना भडभडून आलं. तात्यांचेही डोळे पाणावले. तात्यांनी त्यांच्याकडे पाहून हात जोडले. म्हणाले, ‘मायबापहो! तुमच्यासाठी मी प्राणपणानं लढलो, पण दुर्दैव असं की मी तुमच्या पदरी स्वातंत्र्य टाकू शकलो नाही. माझा जर पुनर्जन्म झाला तर तुमच्या सुखासाठी मी पुन्हा लढेन आणि हा देश स्वतंत्र करेन.’’ तात्यांना जास्त बोलू न देता इंग्रज शिपाई त्यांना घेऊन पुढे गेले.
दुपारी चार वाजता तात्यांना शिवपुरी इथल्या इंग्रजांच्या छावणीत नेण्यात आलं. गावापासून दूर. तात्यांच्या भोवती बंगाल युरोपियन पलटणीचा पहारा होता. पाठीमागे देशी शिपाई आणि तीन घोडेस्वार. सर्व सैनिक तात्यांच्या भोवती कडं करून उभे होते. फाशीच्या वेळी दगा फटका होऊ नये म्हणून ही खबरदारी होती. तिथे पोचल्यावर तात्यांच्या पायातील बेड्या काढण्यात आल्या. तात्या सरळ फासापर्यंत चालत गेले. त्यांना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात आली. तात्या म्हणाले, माझ्या वृध्द पित्याचा छळ करण्यात येऊ नये. रिवाजाप्रमाणे तात्यांचे हातपाय बांधण्यासाठी मारेकरी पुढे झाले. तात्यांनी त्यांना थांबवलं. स्वत:च्या हातांनीच फाशीचा दोर आपल्या गळ्यात घातला आणि ताठ उभे राहिले. दोर ओढला गेला- - - आणि क्षणात तो कणखर मनाचा देह निष्प्राण झाला. १८ एप्रिल १८५९ रोजी इंग्रजांनी तात्या टोपे यांना फाशी दिले. तात्या टोपे, पेशव्यांचा एकनिष्ठ सेवक, १८५७ च्या युध्दाचा नायक, हिंदूस्थानचा प्रजारक्षक, धर्मरक्षक, एक स्वाभीमानी वीरपुरुष, तात्या टोपे, तात्या टोपे, तात्या टोपे.
आळेकरबुवांनी डोळे मिटले. त्यांचा ऊर भरून आला होता. त्यांनी सूर लावला आणि गाऊ लागले
जे बीज भुई खोविले/ तेचि वरी रुख जाहले//
तात्यांनी प्रजातंत्राचं बीज रोवलं होतं. ते पुढे उगवलं होतं. बुवा पुन्हा पूर्वरंगाकडे वळणार होते, पण त्यांनी डोळे उघडले आणि पाहतात तो देवळातील सर्व श्रोते तात्या टोपे यांच्या पुतळ्यासमोर हात जोडून उभे होते. तरुण गात होते,
कदम कदम बढाए जा,खुशी के गीत गाए जा /
ये जिंदगी है कौम की तू कौमपे लुटाए जा//
*****
सौ.पुष्पा काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,
नागपूर ४४० ०२२ दूरध्वनी क्र. (०७१२) २२२१६८९
१० डिसेंबर २०१३ ला पूर्ण केली.
१० डिसेंबर २०१३ ला प्रसिध्द केली.
१३ डिसेंबर २०१३. देहावसान
Comments
Post a Comment